अनधिकृत वाहनांचे परवाने तात्काळ रद्द करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 11:46 IST2019-08-02T11:44:27+5:302019-08-02T11:46:45+5:30
रस्ता सुरक्षा समिती बैठक : तपासणी करुन गतिरोधक हटविण्याच्या सूचना

अनधिकृत वाहनांचे परवाने तात्काळ रद्द करणार
जळगाव : रस्ते सुरक्षेत कुठलीही तडजोड न करता प्रादेशिक परिवहन विभागाने एक धडक मोहिम उभारून सर्व वाहनांची सखोल तपासणी करावी. तपासणी मोहिमेत आढळून आलेल्या अनधिकृत वाहनांचे परवाने तात्काळ रद्द करण्याच्या सूचना गुरूवारी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिल्या.
गुरूवारी त्यांच्या दालनात जिल्हा रस्ते सुरक्षा समितीची बैठक झाली. त्याप्रसंगी त्यांनी परिवहन, पोलीस आणि सर्व संबंधित विभागांना सूचना केल्यात. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन.पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एन.एस.चव्हाण, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, नहीचे अधिकारी सी.एम.सिन्हा, हितेश अग्रवाल, शिक्षणाधिकारी डॉ.डी.एस.देवांग, सा.बां.विभागाचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, कार्यकारी अभियंता विलास पाटील, विद्युत मंडळाचे एस.एस.साळुंखे, मनपाचे अतिक्रमण विभागाचे एच.एन.खान आदी अधिकारी उपस्थित होते.
अनधिकृत गतीरोधक त्वरित काढा
डॉ.ढाकणे यांनी अनधिकृत गतिरोधकांची तात्काळ पाहणी करून ती काढून टाकण्याच्या सूचना महानगरपालिकेचे अभियंता भोळे यांना केल्या. महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गालगत असलेली रहिवासी, दुकाने किंवा आठवडे बाजाराच्या निमित्ताने होत असलेली अतिक्रमणे, रस्त्यात वाहने उभी करणे असे प्रकार सर्व संबंधितांनी पोलिसांची मदत घेवून थांबवावेत, अशाही सूचना त्यांनी केल्या़
अपघातांना खराब रस्त्यांसह खड्डेही कारणीभूत
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी गतवर्षाच्या तुलनेत अपघातात तब्बल १५ टक्यांनी झालेल्या वाढीबाबत चिंता व्यक्त करून यावर सर्वांनी सर्वसमावेशक चिंतन करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. या वाढलेल्या अपघातांच्या प्रमाणाला नादुरूस्त वाहने, बेशिस्त वाहन चालविण्याऱ्या बरोबरच खराब रस्ते किंवा त्यावर पडलेले खड्डेही कारणीभूत असल्याचे सांगितले.