शेकडोंचा आधारवड हरविला, रतनलाल बाफना यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2020 16:10 IST2020-11-16T16:09:41+5:302020-11-16T16:10:13+5:30
सुवर्णनगरी पोरकी : संध्याकाळी पाच वाजता अहिंसा तीर्थ येथे अंत्यसंस्कार जळगाव : शाकाहार सदाचारचे प्रणेता, स्वर्णनगरी जळगावचे नाव देशभर ...

शेकडोंचा आधारवड हरविला, रतनलाल बाफना यांचे निधन
सुवर्णनगरी पोरकी : संध्याकाळी पाच वाजता अहिंसा तीर्थ येथे अंत्यसंस्कार
जळगाव : शाकाहार सदाचारचे प्रणेता, स्वर्णनगरी जळगावचे नाव देशभर पोहचविणारे, सुवर्ण व्यावसायिक आर.सी. बाफना ज्वेलर्सचे संचालक रतनलाल सी. बाफना (८६) यांचे सोमवार, १६ नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी संध्याकाळी पाच वाजता अहिंसा तीर्थ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
बाफना यांच्या निधनामुळे जळगावातील व्यापार, उद्योग, सामाजिक क्षेत्रात दुःखाचे वातावरण पसरले असून शेकडोंचा आधारवड हरविल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे.
गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थमुळे बाफना यांच्यावर उपचार सुरू होते.
जळगावात एक छोटेसे दुकान टाकून सुवर्ण व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवणारे बाफना यांनी विश्वास, सचोटी, पारदर्शकता या बळावर जळगावातील सोने देशभर पोहचविले. एका छोट्या दुकानापासून मोठ्या शोरूमपर्यंतचा प्रवास करणारे बाफना यांनी या व्यवसायाच्या माध्यमातून शेकडोंना रोजगार उपलब्ध करून दिला.
हळूहळू हा व्यवसाय औरंगाबाद, नाशिक अशा वेगवेगळ्या शहरात बाफना ज्वेलरच्या शाखा सुरू केल्या. या सोबतच जळगावनजीक गोशाळा सुरू करून मुक्या गुरांना आधार दिला.
शैक्षणिक मदत
बाफना यांनी व्यवसायासोबत सामाजिक बांधिलकी जपत आर्थिक संकटात असलेल्यांना आधार दिला. तसेच अनेक गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करीत त्यांना आधार दिला.
बाफना यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. या परिवारासोबतच सुवर्ण पेढ्यांमधील कर्मचार्यांचाही आधार हरविल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे.
जैन समाजासाठीही मोठे योगदान
व्यवसाय, गोरक्षा अशा कार्यासह बाफना यांनी जैन धर्मियांच्या साधू संत, मुनी यांच्यासाठी निवासस्थान, धर्मशाळा सुरू केल्या.