पावणेचार किमीच्या रस्त्यासाठी लागणार किती काळ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:20 IST2021-09-15T04:20:43+5:302021-09-15T04:20:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : अजिंठा चौफुली ते कुसुंबा हा पावणेचार किमी अंतराचा रस्ता महामार्ग प्राधिकरणाच्या धुळे कार्यालयाकडे ...

पावणेचार किमीच्या रस्त्यासाठी लागणार किती काळ?
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : अजिंठा चौफुली ते कुसुंबा हा पावणेचार किमी अंतराचा रस्ता महामार्ग प्राधिकरणाच्या धुळे कार्यालयाकडे देण्यात आला आहे. त्यालादेखील अनेक महिने उलटले. त्यानंतर या मार्गाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. रस्ते खोदण्यात आले. मात्र, रस्त्याच्या मधोमध येणारे खांब आणि पाण्याच्या पाइपलाइन हलविण्याची परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे अजूनही हे काम थंड बस्त्यातच आहे. रस्त्याचा अर्धा भाग खोदून ठेवल्याने वैतागलेले जळगावकर या रस्त्यासाठी किती काळ लागणार असा प्रश्न विचारत आहेत.
या रस्त्याच्या खोदकामाला मार्च महिन्यात सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर हे काम लवकर पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती. खोदकामाला सुरुवात करताना प्राधिकरणाने या रस्त्याच्या मध्ये असलेले विद्युत खांब आणि एमआयडीसी आणि मजिप्राच्या पाण्याच्या पाइपलाइन हलविण्याची परवानगी मागितली होती. मात्र, त्यात प्रत्येक वेळी तांत्रिक अडचण येत राहिल्याने हे काम पुढे सरकू शकले नाही. या पावणेचार किमीच्या रस्त्याचे काम सुरू करताना याचा विचार न केल्याने आता हजारो नागरिकांना आणि औरंगाबादकडे जाणाऱ्यांची गैरसोय होत आहे.
हा रस्ता चार किमीचा आहे. मात्र, त्यातील काही भाग हा जळगाव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गतच होणार आहे. अजिंठा चौफुलीकडून औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या या रस्त्यावरील २५० मीटरचा रस्ता जळगाव विभाग करील. मात्र, उरलेल्या रस्त्याच्या कामात अनेक अडचणी येत आहेत.
एमआयडीसीला मोठा फटका
औद्योगिक वसाहतीत जाणाऱ्या लाखो कामगारांना या रस्त्याचा वापर करावा लागतो. अयोध्यानगर, सुप्रीम कॉलनी कुसुंबा, रामेश्वर कॉलनी या भागांत जाण्यासाठीदेखील नागरिक या रस्त्याचा वापर करतात. मात्र, अर्धा रस्ता खोदून ठेवल्यामुळे नागरिकांना येथे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यात अनेक वेळा येथे किरकोळ अपघातदेखील होत आहेत.
कोट -
या रस्त्यात असलेल्या पाइपलाइन्स हलविण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू आहे. त्यात आलेल्या तांत्रिक अडचणींवरदेखील उत्तर एक किंवा दोन दिवसांत देण्यात येईल.
-विकास महाले, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण