‘सिव्हील’मधून परिचारिका रफूचक्कर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 12:55 IST2019-08-20T12:53:41+5:302019-08-20T12:55:19+5:30
तरुणही बेपत्ता : तिसऱ्या दिवशी पोलिसात नोंद

‘सिव्हील’मधून परिचारिका रफूचक्कर
जळगाव : शासकीय गणवेश परिधान करुन ड्युटीला निघालेली २२ वर्षीय परिचारिका (विद्यार्थिनी) शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयातून रफूचक्कर झाल्याची घटना उघडकीस आली असून तीन दिवसानंतर सोमवारी याप्रकरणी पोलिसात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, याच परिसरातून आणखी १८ वर्षीय तरुणीही बेपत्ता झाली असून तिचीही नोंद पोलिसात झाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही विद्यार्थिनी परिचारिका प्रशिक्षण केंद्रात द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. गेल्या वर्षी ती नापास झाली होती. दरम्यान, यापूर्वीही तिने दोन वेळा असा प्रयत्न केला होता, तेव्हा पालकांना बोलावून हा प्रकार कळविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. आता एक तरुणही बेपत्ता झाला आहे. त्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
रफूचक्कर झालेली परिचारिका यावल तालुक्यातील रहिवाशी असून ती रुग्णालयाच्या वसतीगृहात वास्तव्याला होती. शनिवारी तिची आपत्कालिन कक्षात सकाळची ड्युटी होती. त्यानुसार ही परिचारिका शासकीय गणवेशावर वसतीगृहातून ८ वाजता ड्युटीला जायला निघाली, मात्र ती ड्युटीवर पोहचलीच नाही. विभागातून विचारणा व्हायला लागल्यानंतर अन्य सहकाऱ्यांनी चौकशी केली, मात्र काहीच माहिती मिळाली नाही. तिच्या आईकडे चौकशी केली असता तेथेही पोहचलेली नव्हती. त्यामुळे घाबरलेल्या आई व भावान दुपारी रुग्णालय व वसतीगृह गाठले. दोन दिवस सुटी असल्याने वसतीगृहात चौकशी करुनही माहिती मिळाली नाही. त्यामुळे सोमवारी हरविल्याची नोंद करण्यात आली.
दोन मुलींची सारखीच नोंद
रुग्णालयाच्या बाहेरुन १८ वर्षीय तरुणी त्याच दिवशी व त्याच वेळी गायब झालेली आहे. ही तरुणी शहरातीलच रहिवाशी असून त्याचीही सोमवारी दुपारी पोलिसात हरविल्याची नोंद झाली आहे.दोघांच्या नोंदीत फक्त २० मिनिटाचा फरक आहे. या तरुणीची तक्रार आईने तर दुसºया तरुणीची तक्रार भावाने दिली आहे. दरम्यान, वसतीगृहातून परिचारिका रफूचक्कर झाल्याने एकच खळबळ उडाली असून येथील सुरक्षेचे वाभाडे निघाले आहेत. दरम्यान, ड्युटीवर तसेच वसतीगृहात मोबाईल बंदी असताना येथे मोबाईलचा सर्रास वापर होत असल्याची माहिती मिळाली.