सोशल मीडियावर वाढली गुंडागर्दी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:20 IST2021-08-26T04:20:34+5:302021-08-26T04:20:34+5:30

जळगाव : वाढदिवसाचा केक तलवारीने कापणे असेल किंवा लग्नात नाचताना तलवार मिरविणे, पिस्तूल दाखविणे, हवेत गोळीबार करणे याची फॅशन ...

Hooliganism on social media! | सोशल मीडियावर वाढली गुंडागर्दी !

सोशल मीडियावर वाढली गुंडागर्दी !

जळगाव : वाढदिवसाचा केक तलवारीने कापणे असेल किंवा लग्नात नाचताना तलवार मिरविणे, पिस्तूल दाखविणे, हवेत गोळीबार करणे याची फॅशन होत चालली असून अलीकडे वेगवेगळे व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर टाकून दादागिरी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. जळगाव जिल्ह्यात वर्षभरात असे अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत. शिवाजीनगरात एका लग्नात नाचताना पिस्तूल दाखविल्याचा प्रकार घडला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधिताला अटक करण्यात आली होती. त्याआधी देखील तलवारीने केक कापल्याचे फोटो व्हायरल झाल्याने त्या तरुणासह टोळक्याविरुद्ध आर्म ॲक्टचा गुन्हा दाखल झाला होता.

दाखल गुन्हे

२०१९ -४

२०२० -६

२०२१ (ऑगस्टपर्यंत) -५

तलवारीने केक कापण्याची फॅशन

अलीकडे तलवारीने केक कापून त्याचे फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याचे प्रकार वाढले आहेत. काव्यरत्नावली चौक, मेहरुण तलाव, कोल्हे हिल्स आदी भागात वाढदिवस साजरे करताना तलवारीने केक कापले जात असल्याचे प्रकार घडलेले आहेत. अडीच वर्षांत अंदाजे १५ गुन्हे दाखल झालेले आहेत. यात खास करून पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांकडूनच असा प्रकार केला जातो. सामान्य व्यक्ती असे धाडस करीत नाही. खेळण्यातील पिस्तूलचे फोटो काढून ते देखील सोशल मीडियात व्हायरल केले जात आहे. महाविद्यालयीन तरुणांमध्ये देखील याची क्रेझ बघायला मिळत आहे. शिरसोलीत देखील बुधवारी एक तलवार आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

कट्टा, तलवार अन् चाकू...

कट्टा, तलवार अन् चाकू ही शस्त्रे उगवत्या गुन्हेगारांसाठी फॅशन आहे. गेल्या आठवड्यातच पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या यावल तालुक्यातील तरुणाकडे गावठी पिस्तूल आढळून आले तर सोमवारी हरिविठ्ठलनगरातील तरुणाकडे विदेशी बनावटीचे महागडे पिस्तूल आढळून आले. या सहा महिन्यांत जळगाव व भुसावळ या दोन शहरांत मोठ्या प्रमाणात गावठी पिस्तूल व चाकू हस्तगत करण्यात आलेला आहे. शिक्षणाच्या वयातील मुलांकडे कट्टा व चॉपर सहज मिळून येत असल्याने युवा पिढीसाठी ही धोक्याची घंटा आहे.

लाइक करणारेही येणार अडचणीत

तलवारी केक कापणे, लग्नात नाचताना तलवार फिरविणे, पिस्तूलचे प्रदर्शन करून ते व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अशा व्हिडिओ-फोटोंना लाइक करणाऱ्यांवरही पोलीस कारवाई करू शकतात. त्यामुळे गुन्हेगारीला एक प्रकारे प्रोत्साहनच दिले जाते. त्यामुळे अशा फोटो, व्हिडिओंना लाइक करणे घातक असून, असे प्रकार टाळलेलेच बरे.

कोट...

तलवार, पिस्तूल असो किंवा कोणतेही शस्त्र घेऊन त्याचे प्रदर्शन, फोटो, व्हिडिओ काढून तो व्हायरल केला तर कारवाई केलीच जाते. मुळात बेकायदेशीर शस्त्र बाळगणे गुन्हाच आहे. सोशल मीडियात व्हायरल झालेल्या फोटो, व्हिडिओंवरून संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल झालेले आहेत.

-डॉ. प्रवीण मुंढे, पोलीस अधीक्षक

Web Title: Hooliganism on social media!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.