जिल्ह्यात आगामी पाच दिवस अतिवृष्टीचा अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:15 IST2021-07-26T04:15:23+5:302021-07-26T04:15:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली असून, दररोज काही भागात पावसाची हजेरी लागत आहे. ...

जिल्ह्यात आगामी पाच दिवस अतिवृष्टीचा अंदाज
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली असून, दररोज काही भागात पावसाची हजेरी लागत आहे. दरम्यान, आगामी पाच दिवस जिल्ह्यात जोरदार ते अति जोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. अरबी समुद्रातून उत्तर-पूर्वेकडे जाणाऱ्या वाऱ्यानी दिशा बदलल्यामुळे जिल्ह्यात मान्सून खऱ्याअर्थाने सक्रिय होण्याचा अंदाजही हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.
जिल्ह्यात जून महिन्यात मान्सून वेळेवर दाखल होऊनदेखील पावसाने पाठ फिरवली होती. जून महिन्यात सरासरीपेक्षा १५ टक्के कमी पाऊस पडला होता, तर जुलै महिन्याच्या १५ तारखेपर्यंत जुलै महिन्यातील सरासरी भरते की नाही, याबाबत साशंकता होती. जुलै महिन्यात पावसाची सरासरी पाहता, गेल्या दोन वर्षाच्या सरासरीपेक्षा चांगला पाऊस पडला आहे. जुलै २०१९ मध्ये जिल्ह्यात ९० मि.मी., तर २०२० मध्ये ९५ मि.मी. पाऊस झाला होता. मात्र, यावर्षी जुलै महिन्यात २५ जुलैपर्यंत ११९ मि.मी. पाऊस झाला आहे. तसेच हवामान खात्याने मान्सूनआधी वर्तविलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात यंदा जून व जुलै महिन्यात पावसाचे मोठे खंड राहून ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला होता.
मुंबई, कोकणमध्ये पाऊस असताना जळगावात का नाही ? १. जिल्ह्यातील नागरिकांच्या समजाप्रमाणे मुंबईत पाऊस झाला की काही दिवसात जिल्ह्यात देखील पाऊस होत असतो. मात्र, यावर्षी मुंबईत जोरदार पाऊस होत असतानाही जिल्ह्यात पाऊस पडत नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल बनले होते. मुंबईत पाऊस झाल्यानंतर वाऱ्याच्या दिशेनुसारच हा पाऊस होत असतो.
२. यावर्षी अरबी समुद्रातून मान्सून मुंबईत दाखल झाल्यानंतर मान्सूनचे ढग थेट सुरत-वापी मार्गे मध्य प्रदेश व गुजरातमध्ये दाखल झाले. जे ढग नेहमी जळगाव जिल्ह्याकडे येत होते, ते यंदा वाऱ्याच्या बदललेल्या दिशेमुळे मध्य प्रदेशकडे जात होते. मात्र, आता वाऱ्याची दिशा बदलली असून, जिल्ह्याला याचा फायदा होणार आहे. त्यामुळेच आगामी पाच दिवस जिल्ह्यात अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
९० टक्के पेरणी
जिल्ह्यात आतापर्यंत ९० टक्के पेरणी झाली आहे. कापसाच्या अपेक्षित क्षेत्रात १० टक्के घट झाली आहे, तर बाजरी, मक्याच्या क्षेत्रात काही टक्क्यांनी वाढ झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आता पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतातील पिके देखील चांगल्या प्रकारे तरारली असल्याने शेतकरी आनंदात आहेत.
कोट
जिल्ह्यात यंदा सरासरीच्या ९८ टक्के पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार जिल्ह्यात २०० मि.मी. पाऊस झाला असून, सरासरीच्या ५२ टक्के पाऊस पडला आहे. ऑगस्ट महिन्यात व सप्टेंबर महिन्यात देखील काही दिवस पावसाचे खंड राहण्याची शक्यता आहे. सरासरीवर मात्र त्याचा फारसा परिणाम होणार नाही. जिल्ह्यात सरासरीपेक्षाही काही टक्के पाऊस चांगला होणार आहे.
- डॉ. रामचंद्र साबळे, हवामान तज्ज्ञ