जळगावात अठराशे रुपयाची लाच स्विकारताना तलाठ्याला पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 20:15 IST2017-12-06T20:12:57+5:302017-12-06T20:15:46+5:30
वीट भट्टी व्यवसायासाठी आवश्यक असलेला ‘कुंभार व वीट भट्टी व्यावसायिक’ याचा दाखला देण्यासाठी जुने जळगावातील तलाठी फिरोज खान अय्युब खान (वय ४० रा.रजा कॉलनी, मेहरुण, जळगाव) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एक हजार ८०० रुपयांची लाच घेताना बुधवारी सायंकाळी तलाठी कार्यालयातच पकडले.

जळगावात अठराशे रुपयाची लाच स्विकारताना तलाठ्याला पकडले
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,६: वीट भट्टी व्यवसायासाठी आवश्यक असलेला ‘कुंभार व वीट भट्टी व्यावसायिक’ याचा दाखला देण्यासाठी जुने जळगावातील तलाठी फिरोज खान अय्युब खान (वय ४० रा.रजा कॉलनी, मेहरुण, जळगाव) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एक हजार ८०० रुपयांची लाच घेताना बुधवारी सायंकाळी तलाठी कार्यालयातच पकडले.
तक्रारदार यांनी वीट भट्टी सुरु करावयाची असल्याने त्यांनी भाडे तत्वावर त्यासाठी जमीन घेतली आहे. हा व्यवसाय सुरु करताना दरवर्षी तहसीलदारांचा दाखल लागतो. त्यापूर्वी तलाठी यांच्याकडून कुंभार व वीट भट्टी व्यावसायिक असल्याचा दाखल घ्यावा लागतो. हा दाखल घेण्यासाठी तक्रारदार हे बुधवारी तलाठी फिरोज खान याच्याकडे गेले असता त्याने दोन हजाराची मागणी केली. तडजोडीअंती एक हजार ८०० रुपये देण्याचे ठरले.
एकाच दिवसात पडताळणी व कारवाई
दरम्यान, संबंधित कुंभाराने दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांची भेट घेवून तलाठी खान विरुध्द तक्रार केली. त्यानुसार ठाकूर यांनी तक्रारीची पडताळणी केल्यानंतर सायंकाळी साडे पाच वाजता कर्मचारी श्याम पाटील, मनोज जोशी, सुनील शिरसाठ, नासीर देशमुख, सुनील पाटील, प्रवीण पाटील, अरुण पाटील, प्रशांत ठाकुर व ईश्वर धनगर यांच्या पथकासह रथ चौक परिसरातील तलाठी कार्यालयात सापळा लावला असता खान याला एक हजार आठशे रुपये स्विकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी शनी पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.