मागणी वाढली मात्र उत्पादनात घट : भाव ९ हजारांपर्यंत जाऊनही अतिवृष्टीमुळे शेतातच सडतोय कापूस
लोकमत न्यूज नेटवर्क
अजय पाटील
जळगाव -आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची मागणी वाढल्याने शेतकऱ्यांचा कापसाला यावर्षी विक्रमी भाव मिळण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी मुहूर्ताच्या कापसाला ९ हजार रुपये क्विंटल इतका भाव जाहीर झाला असताना, दुसरीकडे मात्र अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा नशिबी हा चांगला भाव मिळण्याची शक्यता कमीच झाली आहे. जिल्ह्यातील अनेक भागात अतिवृष्टीमुळे पूर्व हंगामी कापूस शेतातच पडून खराब होत आहे. त्यामुळे कापसाला दमदार भाव मिळूनदेखील शेतकऱ्यांचे यंदाही नुकसानच होणार असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
गेल्या काही वर्षांपासून अमेरिका व चीनमधील ट्रेडवॉरमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची मागणी घटली होती. यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत नव्हता. मात्र, यावर्षी ट्रेड वॉरचा कोणताही परिणाम कापसाच्या मागणीवर राहणार नसून, भारताची निर्यातदेखील यंदा वाढणार आहे. त्यातच गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा कापसाचा पेरादेखील कमी झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची मागणी वाढणार असल्याने यावर्षी कापसाला हमीभावापेक्षाही जास्त भाव शेतकऱ्यांना खासगी बाजारात मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. मात्र, ऐन वेचणीवर पीक आले असतानाच निसर्गाने केलेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचा आनंद औट घटकेचा ठरला आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
कापसाच्या उत्पादनात २५ टक्के येणार घट
जिल्ह्यात यंदा ४ लाख ९२ हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली होती. गेल्या वर्षाच्या तुलनेत पेरणी क्षेत्रात घट झाली होती. त्यातच गेल्या पंधरा दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे एकूण उत्पादनात २५ टक्के घट होण्याची शक्यता आहे. विशेष करून पूर्व हंगामी लागवड झालेल्या कापसाच्या क्षेत्रात तर ४० टक्क्यांहून अधिक घट होण्याची शक्यता आहे.
खासगी बाजारात ७ हजारांपर्यंत मिळणार भाव?
एकीकडे आंतराष्ट्रीय बाजारात यंदा कापसाची मागणी असताना, दुसरीकडे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. मागणी जास्त व उत्पादन कमी असल्याने कापसाच्या भावात गेल्या वर्षाच्या तुलनेत १ हजार रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. शासनाने निश्चित केलेला कापसाचा हमीभाव ६ हजार ५० इतका असला तरी शासकीय खरेदी केंद्रापेक्षाही खासगी बाजारात कापसाला चांगला भाव मिळण्याची शक्यता असून, कापसाचे दर यंदा ७ हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
खान्देशात कापसाची झालेली लागवड - ९ लाख हेक्टर
अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान - २५ ते ३० टक्के
उत्पादन होण्याची शक्यता - १३ लाख गाठी
कसा राहिल भाव - ६ हजार ते ७ हजारपर्यंत
शासकीय खरेदी केंद्र सुरू होण्याची शक्यता कमीच
खासगी बाजारात कापसाला ६ हजार ५०० पेक्षा अधिक भाव मिळण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांचा कापूस विक्रीचा कल हा खासगी जिनिंगवरच राहणार आहे. कारण शासकीय खरेदी केंद्रावर मिळणारा हमीभाव हा कमी असून, अनेक नियमांमुळे तो भावदेखील मिळण्याची शक्यता कमीच असते. त्यामुळे सीसीआयकडून यंदा खरेदी केंद्र सुरू होण्याची शक्यता कमीच आहे.
---