रेल्वे स्टेशन समोर पुन्हा हातगाड्यांचे अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:46 IST2021-01-08T04:46:47+5:302021-01-08T04:46:47+5:30
जळगाव : गेल्या आठवड्यात मनपाने रेल्वे स्टेशन समोरील खाद्य पदार्थांच्या हातगाड्यांचे अतिक्रमण हटविल्यानंतरही, आठवडाभरात पुन्हा या ठिकाणी जैसे थे ...

रेल्वे स्टेशन समोर पुन्हा हातगाड्यांचे अतिक्रमण
जळगाव : गेल्या आठवड्यात मनपाने रेल्वे स्टेशन समोरील खाद्य पदार्थांच्या हातगाड्यांचे अतिक्रमण हटविल्यानंतरही, आठवडाभरात पुन्हा या ठिकाणी जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पोलीस चौकीच्या दोन्ही बाजूने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या पर्यंत दररोज वाहतूक कोंडी उद्भवत आहे.
सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत गजबजलेल्या जळगाव रेल्वे स्टेशनसमोर अतिक्रमणामुळे अनेक वादाचे प्रकार घडले आहेत. जागोजागी लागलेल्या रिक्षा अन् इतर दुचाकी, चारचाकी वाहनांमुळे दररोज या ठिकाणी वाहतूक जाम होत आहे. असे असतांना त्यात स्टेशनसमोर रस्त्याच्या दोन्ही बाजूने खाद्य पदार्थ विक्रेत्यांच्या हातगाड्या लागत असल्यामुळे, या कोंडीत अधिकच भर पडत आहे. गेल्याच आठवड्यात मनपा अतिक्रमण विभागाने केेलेल्या कारवाईत, अनेक विक्रेत्यांच्या हातगाड्या जप्त केल्या होत्या. यामुळे कोंडीची समस्या मिटून, परिसराने मोकळा श्वास घेतला होता.मात्र, आठवडाभरानंतर पुन्हा या ठिकाणी हातगाड्यांनी अतिक्रमण केले आहे.
इन्फो :
कारवाईत सातत्य नसल्याने, विक्रेत्यांचे फावले
मनपातर्फे महिना, दोन महिन्यातून स्टेशन समोरील विक्रेत्यांवर कारवाई सुरूच असते. मात्र, या कारवाईत सातत्यता राहत नाही. कारवाई केल्यानंतर पुन्हा दुसऱ्याच दिवशी हातगाड्या थाटतात. मनपाचे पथक आल्यावर, अवघ्या दहा मिनिटात एखादी हातगाडी जप्त करुन निघून जाते. नंतर मात्र येत नाही. अशा प्रकारे मनपातर्फे कारवाईत सातत्याचा अभाव आणि थातूरमातूर कारवाई होत असल्यामुळे विक्रेत्यांचे फावले असल्याचे नेहमी ये-जा करणाऱ्या प्रवाशांनी सांगितले.