जीएमसीत ‘अर्धा’ डोस ठरतंय वादाचे कारण; रुग्णांच्या नातेवाईकांचा संताप
By अमित महाबळ | Updated: November 6, 2023 19:22 IST2023-11-06T19:22:05+5:302023-11-06T19:22:32+5:30
जिल्ह्याभरातील रुग्ण उपचारासाठी जीएमसीच्या ओपीडीत येत असतात. त्यांना डॉक्टर औषधे लिहून देतात, ती रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या औषध भांडार कक्षातून घ्यावी लागतात.

जीएमसीत ‘अर्धा’ डोस ठरतंय वादाचे कारण; रुग्णांच्या नातेवाईकांचा संताप
अमित महाबळ
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (जीएमसी) ओपीडीत येणाऱ्या रुग्णांना औषध भांडार कक्षातून डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांपेक्षा अर्धाच डोस मिळत असून, यामुळे कक्षातील कर्मचारी व रुग्णांचे नातेवाईक यांच्यात वाद होत आहेत. दरम्यान, गरज असलेल्या आजारांत १५ ते एक महिन्यापर्यंतची संपूर्ण औषधे दिली जात असल्याचा दावा जीएमसीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
जिल्ह्याभरातील रुग्ण उपचारासाठी जीएमसीच्या ओपीडीत येत असतात. त्यांना डॉक्टर औषधे लिहून देतात, ती रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या औषध भांडार कक्षातून घ्यावी लागतात. मात्र डॉक्टर लिहून देतात त्यापेक्षा अर्धीच औषधे दिली जातात म्हणून कक्षातील कर्मचारी आणि रुग्णांचे नातेवाईक यांच्यात वाद होत आहेत. जीएमसीमध्ये लांबवरून औषधोपचार घेण्यासाठी येणाऱ्या गरीब रुग्णांची संख्या अधिक असते. त्यांना वारंवार जळगावला येण्याचे प्रवास भाडे परवडत नाही. त्यामुळे डॉक्टर जेवढी औषधे लिहून देतील त्याच संख्येत मिळाली पाहिजेत, अशी मागणी रुग्णांकडून होत आहे. तसेच औषधी भांडार कक्षातील कर्मचारी अनेकदा मोबाईलवर व्यस्त असतात. त्यांच्याकडून लवकर औषधे मिळत नाहीत. त्यांच्यावर कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान, जीएमसीचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. मारुती पोटे यांनी मोठे आजार झालेल्या रुग्णांवर भरती करूनच उपचार होतात. मधुमेह, उच्च रक्तदाब, पॅरालिसीस, मानसिक आजार असलेल्या रुग्णांना १५ दिवस ते एक महिन्याची संपूर्ण औषधे दिली जात आहेत, असे सांगितले.