भुसावळातील रस्त्यांवरून पालकमंत्री संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:22 IST2021-09-08T04:22:01+5:302021-09-08T04:22:01+5:30
भुसावळ शहरातील शहरातील कामे मार्गी लागावे याकरिता शासनाने भरभरून निधी दिलेला आहे. मात्र तरीही कामे पाहिजे त्या ...

भुसावळातील रस्त्यांवरून पालकमंत्री संतप्त
भुसावळ शहरातील शहरातील कामे मार्गी लागावे याकरिता शासनाने भरभरून निधी दिलेला आहे. मात्र तरीही कामे पाहिजे त्या गतीने होताना दिसून येत नाही. जामनेररोडवरील नाहाटा कॉलेज ते वाल्मीक चौक, वाल्मीक चौक ते एचडीएफसी बँक व पुढे अमरस्टोर ते बस स्टँड परिसर व शहर पोलीस ठाणेसमोरील, वसंत ऑफिसकडे जाणारा रस्ता पूर्णतः खड्डेमय झाला असून, यावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी चांगलेच संतापलेले दिसून आले. रस्ते खराब असल्यामुळे शहराचा सत्यानाश होत असल्याची जळजळीत प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली. कामे त्वरित मार्गी लावा, असे मोबाइलद्वारे त्यांनी पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी बोलताना सांगितले.
पालकमंत्री नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना रस्त्यांच्या परिस्थितीवरून नाराजी व्यक्त करत असतानाचा व्हिडिओ शहरातील विविध ग्रुपवर व्हायरल झाला असून, सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी व पालिका प्रशासन चांगलीच ट्रोल होताना दिसून येत आहेत, तर भुसावळ करांच्या तोंडावर ‘ओ सेठ, भुसावळचे रस्ते गेले खड्ड्यात थेट’... असे सहज उच्चारले जात आहे.
रस्त्यांसाठी १२ कोटी
नेहमी कुठल्या ना कुठल्या विषयावरून प्रकाशझोतात असणाऱ्या जंक्शन शहरामध्ये सद्यस्थितीला जामनेररोड संपूर्णत: खड्ड्यांमध्ये गेलेला आहे. भरभरून निधी देऊन सुद्धा पाहिजे त्या प्रमाणात काम झालेली नाही, पालिकेने शहरात १२ कोटींच्या निधीतून रस्त्याचे काम सुरू केली असून, मंजूर असून त्यापैकी फक्त ५५ टक्के कामे झाले असून यात केवळ डांबरीकरण अर्थात बीबीएम झाले आहे. सीलकोट व कारपेटची कामे अद्यापही संथगतीने आहे. किंबहुना रेंगाळली आहेत यामुळे भुसावळकरांचे अतोनात हाल होताना दिसून येत आहे.