सावखेडा (ता. रावेर) : सावखेडा खुर्द येथील मागे तहकूब झालेली ग्रामसभा ग्रामपंचायत येथे घेण्यात आली. यावेळी विविध विषयांवर ग्रामस्थांनी पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले.
सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात येऊन ते ठराव मंजूर झाले. विविध विषयांमध्ये योजनानिहाय झालेल्या जमा-खर्चास मंजुरी देणे, सावखेडा खुर्द ते लोहारा रस्ता डांबरीकरण करणे, प्रधानमंत्री आवास योजना ‘ड’ यादीतील नावे आधारकार्डाशी लिंक करणे, जॉबकार्ड मॅपिंग करणे, अन्नसुरक्षा योजना यादींमध्ये नवीन रेशनिंग कार्डधारकांची नावे समाविष्ट करणे, मनरेगा योजनेंतर्गत गुरांसाठी शेड, कुक्कुटपालनसाठी शेड, लाभार्थींच्या नावांची यादी करून प्रस्ताव सादर करणे, गावात औषध फवारणी करणे, महिला ग्राम संघासाठी इमारत खोली उपलब्ध करून देणे, महिला सार्वजनिक शौचालयाची दुरुस्ती करणे, नवीन भागात सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी गटार बांधकाम करणे इत्यादी विषयांवर चर्चा झाली. मात्र, १४ व्या वित्त आयोगातून बांधण्यात आलेल्या गटारीच्या विषयावर ग्रामस्थांनी सरपंच यांना धारेवर धरले.
याप्रसंगी सरपंच बेबाबाई बखाल, उपसरपंच सविता नवले, ग्रामसेवक आर. जी. चौधरी, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
सावखेडा खुर्द ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा करताना सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य.
(छाया : योगेश सैतवाल)