सुवर्ण भरारी १,१५,०००च्या दिशेने; नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दोनच दिवसात तीन हजाराने वाढ
By विजय.सैतवाल | Updated: September 23, 2025 15:21 IST2025-09-23T15:21:10+5:302025-09-23T15:21:10+5:30
दोन दिवसात सोने दोन हजार ९५० रुपयांनी तर चांदी चार हजार ५०० रुपयांनी वधारली.

सुवर्ण भरारी १,१५,०००च्या दिशेने; नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दोनच दिवसात तीन हजाराने वाढ
विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : पितृपक्ष संपून घटस्थापना झाल्यानंतर नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दोनच दिवसात सोने-चांदीच्या भावात मोठी भाववाढ झाली. मंगळवारी (२३ सप्टेंबर) सोन्याच्या भावात एक हजार रुपयांनी वाढ होऊन ते एक लाख १४ हजार ४०० रुपयांवर पोहचले आहे. चांदीच्याही भावात एक हजार रुपयांची वाढ होऊन ती एक लाख ३६ हजार रुपयांवर पोहचली. दोन दिवसात सोने दोन हजार ९५० रुपयांनी तर चांदी चार हजार ५०० रुपयांनी वधारली.
गेल्या महिन्याभरापासून सोने-चांदीच्या भावात सतत वाढ सुरू आहे. त्यात घटस्थाननेच्या दिवशी, सोमवारी (दि. २२) सोन्याच्या भावात एक हजार ९५० रुपयांची वाढ होऊन ते एक लाख १३ हजार ४०० रुपयांवर पोहचले. त्यानंतर मंगळवारी (दि. २३) पुन्हा एक हजार रुपयांची वाढ होऊन ते एक लाख १४ हजार ४०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले आहे.
दुसरीकडे घटस्थाननेच्या दिवशी चांदीच्याही भावात थेट तीन हजार ५०० रुपयांची वाढ होऊन ती एक लाख ३५ हजार रुपयांवर पोहचली. मंगळवारी पुन्हा एक हजार रुपयांची वाढ होऊन ती एक लाख ३६ हजार रुपये प्रति किलोवर पोहचली आहे.
असे आहे भाव
धातू - मूळ भाव - जीएसटीसह
सोने - १,१४,४०० - १,१७,८३२
चांदी - १,३६,००० - १,४०,०८०
अमेरिकन फेडरल बँकेने गेल्या आठवड्यात व्याज दरात कपात केली. त्यानंतर आता पुन्हा व्याजदर कमी होण्याची शक्यता असल्याने सोने-चांदीत गुंतवणूक वाढून त्यांच्या भावात वाढ होत आहे. सोने-चांदीत तेजीचा वेग यापुढेही कायम राहत दिवाळीपर्यंत सोने एक लाख ३५ हजार तर चांदी एक लाख ७५ हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. - अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव सुवर्ण बाजार असोसिएशन.