एक दिवसाच्या वाढीनंतर सोन्यात पुन्हा घसरण; चांदीचे भावही घसरले
By विजय.सैतवाल | Updated: October 27, 2023 15:32 IST2023-10-27T15:32:29+5:302023-10-27T15:32:38+5:30
गुरुवारी सोन्याचे भाव वाढलेले असताना चांदीच्या भावात मात्र एक हजार रुपयांनी घसरण होऊन ती ७२ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली होती

एक दिवसाच्या वाढीनंतर सोन्यात पुन्हा घसरण; चांदीचे भावही घसरले
जळगाव : विजयादशमीच्या पूर्वसंध्येपासून घसरण होत गेलेल्या सोन्याच्या भावात गुरुवार, २६ ऑक्टोबर रोजी ५०० रुपयांची वाढ झाली, मात्र शुक्रवार, २७ ऑक्टोबर रोजी पुन्हा २०० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे सोने ६१ हजार ६०० रुपये प्रति तोळ्यावर आले. चांदीच्या भावातही ३०० रुपयांची घसरण झाली व ती ७२ हजार २०० रुपये प्रति किलोवर आली.
हमास व इस्त्रायल युद्धामुळे पितृपक्षापासूनच भाववाढ सुरू झालेल्या सोने-चांदीच्या भावात विजयादशमीच्या पूर्वसंध्येला २३ ऑक्टोबर रोजी घसरण होऊन ६१ हजार ४०० रुपये प्रति तोळ्यावर आले होते. त्यात विजयादशमीला पुन्हा १०० रुपयांनी भाव कमी झाले. दोन दिवस हे भाव स्थिर राहिल्यानंतर गुरुवार, २६ ऑक्टोबर रोजी सोन्याच्या भावात ५०० रुपयांची वाढ झाली व ते ६१ हजार ८०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले. शुक्रवारी मात्र त्यात पुन्हा २०० रुपयांची घसरण झाली व ते ६१ हजार ६०० रुपये प्रति तोळ्यावर आले.
गुरुवारी सोन्याचे भाव वाढलेले असताना चांदीच्या भावात मात्र एक हजार रुपयांनी घसरण होऊन ती ७२ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली होती. त्यानंतर शुक्रवार, २८ ऑक्टोबर रोजी पुन्हा ३०० रुपयांची घसरण झाली व ती ७२ हजार २०० रुपयांवर आली. हमास-इस्त्रायल युद्ध व जागतिक पातळीवरील अस्थिरता यामुळे शेअर बाजारावर परिणाम होण्यासह सोने-चांदीच्याही भावात चढ-उतार होत असल्याचे सांगितले जात आहे.