सोने-चांदीच्या भावात पुन्हा एकदा मोठी वाढ! सोने ८८,४०० तर चांदी १,००,७०० वर...
By विजय.सैतवाल | Updated: March 15, 2025 13:46 IST2025-03-15T13:45:30+5:302025-03-15T13:46:16+5:30
गेल्या पाच महिन्यांपासून नवनवीन उच्चांक

सोने-चांदीच्या भावात पुन्हा एकदा मोठी वाढ! सोने ८८,४०० तर चांदी १,००,७०० वर...
विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: सोने-चांदीच्या भावात पुन्हा एकदा मोठी वाढ होऊन सोने ८८ हजार ४०० रुपये प्रति तोळा तर चांदी एक लाख ७०० रुपये प्रति किलोवर पोहचली आहे. या दोन्हीही मौल्यवान धातूंचे हे आतापर्यंतचे उच्चांकी भाव आहे.
सुरुवातीला अमेरिकेच्या बँकींग क्षेत्राच्या स्थितीमुळे भाववाढ सुरू झालेले सोने-चांदी गेल्या पाच महिन्यांपासून नवनवीन उच्चांक गाठत आहेत. त्यानंतर अमेरिकेत ट्रम्प सरकार आल्यापासून घेण्यात येत असलेल्या निर्णयांमुळे सोने-चांदी वधारू लागले. या महिन्यात काही दिवसांपासून थोडा-फार चढ-उतार होत असलेल्या सोने-चांदीच्या भावात तीन दिवसांपासून पुन्हा वाढ सुरू झाली.
१२ मार्च रोजी चांदीच्या भावात एक हजार रुपयांनी वाढ होऊन ती ९९ हजारांवर पोहचली. १३ व १४ रोजी याच भावावर स्थिर राहिल्यानंतर शनिवारी (१५ मार्च) चांदीत एक हजार ७०० रुपयांची वाढ झाली व ती थेट एक लाख ७०० रुपये प्रति किलोवर पोहचली. अशाच प्रकारे १२ मार्च रोजी सोने ८६ हजार ६०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचल्यानंतर १३ रोजी त्यात ७०० रुपयांची वाढ होऊन ते ८७ हजार ३०० रुपये झाले. शनिवारी (१५ मार्च) त्यात एक हजार १०० रुपयांची वाढ होऊन ते ८८ हजार ४०० रुपये प्रति तोळा झाले.
चांदीला लाख मोलाची चकाकी
सोने-चांदीचे सध्याचे भाव आतापर्यंतचे उच्चांकी भाव ठरले आहेत. २३ ऑक्टोबर २०२४ रोजी चांदी एक लाख रुपये प्रति किलोवर पोहचली होती. त्यानंतर हे भाव कमी झाले होते. आता १५ मार्च रोजी चांदीने एक लाखाचा पल्ला ओलांडला आहे. तसेच सोनेही या पूर्वी २५ फेब्रुवारी रोजी ८७ हजार १०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले होते. त्यानंतर १३ मार्च रोजी ८७ हजार ३०० व आता १५ मार्च रोजी ८८ हजार पार गेले आहे.
असे आहे भाव
धातू - मूळ भाव - जीएसटीसह
- सोने - ८८,४०० - ९१,०५२
- चांदी - १,००,७०० - १,०३,७२१