शिक्षणाच्या वयात केले घरफोडीचे प्रताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:22 IST2021-09-16T04:22:12+5:302021-09-16T04:22:12+5:30
तांबापुरातील सरफराज खान अयुब खान यांच्या घरातून रोकड, दागिने मिळून ६८ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेल्याची घटना मंगळवारी ...

शिक्षणाच्या वयात केले घरफोडीचे प्रताप
तांबापुरातील सरफराज खान अयुब खान यांच्या घरातून रोकड, दागिने मिळून ६८ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली होती. हा ऐवज खालच्या खोलीत होता तर ते कुटुंबासह वरच्या मजल्यावर झोपले होते. त्यामुळे चोरट्यांनी त्यांच्या वरच्या खोलीसह शेजारच्या लोकांच्या घरांना बाहेरुन कड्या लावल्या होत्या. पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता गुन्ह्याच्या पध्दतीवरुन माहितगार व्यक्तीनेचा हा प्रकार केल्याचा संशय त्यांना आला. त्या दृष्टीने तपासाची दिशा वळविल्यावर याच भागातील दोघाजणांचे नाव पुढे आले. त्यांनी चोरीचा ऐवज मेहरुण तलावाच्या परिसरात लपविल्याचे समजल्यानंतर सहायक फौजदार अतुल वंजारी, सुधीर साळवे, इम्रान सय्यद, मुदस्सर काझी, गोविंदा पाटील व सचिन पाटील यांच्या पथकाने बुधवारी दुपारी तिकडे धाव घेतली असता अल्पवयीन मुलगा मिळून आला. मात्र त्याचा साथीदार सोनू गायब होता. या मुलाला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली देण्यासह ६१ हजार रुपये किमतीचे दागिने काढून दिले. दरम्यान, या अल्पवयीन मुलावर जिल्हा पेठला एक व एमआयडीसीत दोन असे तीन गुन्हे यापूर्वी दाखल असल्याचे निष्पन्न झाले. सोनूच्या शोधार्थ पथक रवाना झाले आहे. या गुन्ह्याचा तपास मुदस्सर काझी करीत आहे.