लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : शिक्षक आणि विद्यार्थी यांचं नातं हे केवळ शिकवण्यापुरतं मर्यादित राहात नाही, तर शिक्षणाची गोडी निर्माण करणाऱ्या शिक्षकांप्रती विद्यार्थ्यांमध्ये विशेष जिव्हाळा असतो. असाच हृदयस्पर्शी प्रकार सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात अनुभवयास मिळाला. तालुक्यातील पाथरी जि. प. शाळेतील शिक्षिका उज्ज्वला सावकारे यांचे नाव जिल्हा समायोजनात आले आहे. त्यामुळे बदलीपूर्वीच चिमुरड्या विद्यार्थ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना भेटून शिक्षिकेची बदली करू नका म्हणून गळ घातली.
सेवाभावी वृत्तीमुळे लळा : शिक्षिका सावकारे या सुटीच्या दिवशीही विद्यार्थ्यांचे वर्ग भरवतात. त्यासोबत त्यांना शिक्षणाकामी लागणाऱ्या वस्तूंचाही स्वखर्चाने पुरवठा करतात. सुट्यांमध्ये घरी मोफत शिकवणी घेणाऱ्या सावकारेंविषयी केवळ विद्यार्थी नव्हे तर पालकही समाधानी आहेत. मात्र, सावकारेंचे नाव जाणीवपूर्वक जिल्हा समायोजनाच्या यादीत समाविष्ट केल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली.
...अन् विद्यार्थी सरसावले
आवडत्या ‘बाईं’ची बदली होणार, याची कुणकुण विद्यार्थ्यांना लागली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सोमवारी सकाळीच जिल्हाधिकारी कार्यालय गाठत त्यांच्या दालनासमोर ठिय्या मांडला. गणवेशात दाखल झालेल्या या विद्यार्थ्यांनी ‘उज्ज्वला मॅडमची बदली करू नका’, असा आग्रही हट्ट जिल्हाधिकाऱ्यांकडे केला.
यादरम्यान, काही विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले. हा प्रकार पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी चिमुरड्यांना धीर देत थेट शिक्षणाधिकाऱ्यांना फोन लावला आणि सेवाज्येष्ठतेनुसारच बदली प्रक्रिया राबवावी, असे निर्देश दिले.
Web Summary : Students protested the transfer of their beloved teacher, Ujjwala Savkare, known for her dedication. They gathered at the Collector's office, prompting the Collector to instruct officials to follow seniority in transfers.
Web Summary : छात्रों ने अपनी प्रिय शिक्षिका, उज्ज्वला सावकारे के स्थानांतरण का विरोध किया, जो अपनी समर्पण के लिए जानी जाती हैं। वे कलेक्टर कार्यालय में एकत्रित हुए, जिससे कलेक्टर को अधिकारियों को स्थानांतरण में वरिष्ठता का पालन करने का निर्देश देना पड़ा।