एरंडोल विधानसभा मतदारसंघातील एरंडोल, पारोळा व भडगाव या तालुक्यांसह जिल्ह्यात कापसावर लाल्यारोग व बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या असलेल्या कापसाची पूर्णपणे नासाडी होत आहे. या अगोदरच उशिराने झालेले वरुण राजाचे आगमन, सारखी पावसाची रिप-रिप, मुसळधार पावसासह वादळ, कोरोना काळ, यामुळे बळीराजा चारही बाजूंनी होरपळला गेलेला आहे. त्यातच कापसावर आलेला लाल्यारोग व बोंडअळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव यामुळे तोंडाशी आलेला घास निसटून गेलेला आहे, तसेच कापसासह ज्वारी व मका या पिकांवरही अळींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे आर्थिक संकटात सापडलेला आहे. अशा संकटाच्या काळात बळीराजाला धीर देणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणून एरंडोल विधानसभा मतदारसंघातील एरंडोल, पारोळा व भडगांव या तालुक्यांसह जळगांव जिल्ह्यात कापसावर आलेला लाल्यारोग व बोंडअळी, ज्वारी व मका या पिकांवर अळींच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून, शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी आमदार चिमणराव पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कृषिमंत्री दादाजी भुसे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि तालुक्याचे तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे केलेली आहे.
नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:17 IST