प्रेमाची 'नशा'! तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं, तिनेच आई-वडिलांना विचारलं "तुम्ही कोण? मी ओळखत नाही"
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 13:07 IST2025-02-26T12:46:12+5:302025-02-26T13:07:08+5:30
जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यात एका गावातील तरुणी घरातून बेपत्ता झाल्याने तिच्या आई वडीलांनी ती हरवल्याची तक्रार दिली. परंतु दोन दिवसांनी म्हणजे रविवारी रात्री ती तरुणी बोदवड पोलिस ठाण्यात हजर झाली.

प्रेमाची 'नशा'! तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं, तिनेच आई-वडिलांना विचारलं "तुम्ही कोण? मी ओळखत नाही"
>> गोपाल व्यास, लोकमत न्यूज नेटवर्क
तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणाऱ्या आई-वडिलांनाच पोलिस ठाण्यात ओळखण्यास नकार देणाऱ्या 'लाडली 'समोर आई वडिलांनी हंबरडा फोडला. कायद्यानं हात बांधावे अन् दोन दिवसांच्या प्रेमानं लाडात वाढवलेल्या लेकीला अलगद मुठीतून घेऊन जावं, अशीच काहीशी परिस्थिती बोदवड पोलिस ठाण्यात एका माता पित्यांवर ओढावली. पोलिसांनी कायद्याची लक्ष्मणरेषा दाखवताच हतबल झालेल्या आई-वडिलांना आल्या पावली परत जावे लागले... या दिवसासाठीच तुला मोठे केले होते का... असा टाहो फोडणाऱ्या आईचे शब्द मात्र दिवसभर परिसरात जणू गुंजत होते.
जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यात एका गावातील तरुणी घरातून बेपत्ता झाल्याने तिच्या आई वडीलांनी ती हरवल्याची तक्रार दिली. परंतु दोन दिवसांनी म्हणजे रविवारी रात्री ती तरुणी बोदवड पोलिस ठाण्यात हजर झाली. यावेळी तिने आपण कायदेशीर मार्गाने लग्न केल्याचे सांगितल्याने पोलिसांनीही तिच्या आई-वडिलांना बोलावून घेतले. आई-वडील समोर आल्यानंतर त्या तरुणीने चक्क 'आपण यांना ओळखत नसल्याचे' सांगितले. हे ऐकून तरुणीच्या आईला रडूच कोसळले. आईने तिला सर्व आणाभाका दिल्या, पण काही फरक पडला नाही. सोबत आलेल्या मामानेही समजावून पाहिले. परंतु सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले. शेवटी पोलिसांना नाईलाजाने आई, वडील, मामा यांना पोलिस स्टेशनच्या बाहेर काढावे लागले.
दुसऱ्या घटनेत मुलाची बदनामी केली म्हणून मुलीच्या नातलगांना बदडले
1. बोदवड तालुक्यातीलच दुस-या एका घटनेत पळून गेलेल्या मुलीच्या नातलगांनी पळवून नेणाऱ्या मुलाच्या नातलगांना जाब विचारला असता त्यांना मारहाण करण्यात आली. मुलगी तर गेलीच शिवाय नातलगांना मारहाणीलाही सामोरे जावे लागले. याप्रकरणी बोदवड पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
2. मुलगी हरवल्याची तक्रार मुलीच्या भावाने दिली होती. त्यात संशयित म्हणून मुक्ताईनगरातील एका तरुणाचे नाव घेण्यात आले. याचा राग आल्याने 'पोलिसांत तुम्ही तक्रार का दिली' याचा जाब विचारत संशयितांनी तरुणीच्या भावाशी व वडिलांशी दोन दिवसांपूर्वी वाद घालण्यात आला. हा वाद विकोपाला जाऊन मारहाणही करण्यात आली. बोदवड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी ही घटना घडल्याने दहा मिनिटांत बाजारपेठेतील व्यावसायिकांनी आपापले प्रतिष्ठाने बंद करत घरचा रस्ता धरला. जखमी झालेल्या तरुणीच्या भावाला जळगाव येथे उपचारासाठी हलविण्यात आले.