एस.टी.च्या वर्धापन दिनानिमित्त जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा बसने प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 12:55 IST2019-06-01T12:14:43+5:302019-06-01T12:55:14+5:30
जळगाव ते जामनेर दरम्यान प्रवाशांशी गप्पा

एस.टी.च्या वर्धापन दिनानिमित्त जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा बसने प्रवास
जळगाव : राज्य परिवहन महामंडळाच्या ७१ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वर्धापन दिनानिमित्त जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी जळगाव ते जामनेर बसने प्रवास केला. या वेळी त्यांनी बस चालक व वाहक यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कारही केला. प्रवासादरम्यान त्यांनी प्रवाशांनी गप्पादेखील मारल्या.
महाजन यांच्या सोबत जळगाव मनपाचे भाजपचे गटनेते भगत बालानी, नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, नगरसेवक सुनील खडके, अरविंद देशमुख, अंगरक्षक आदी उपस्थित होते. वर्धापन दिनानिमित्त रांगोळी व फुलांच्या माळांनी स्थानकाला सजविण्यात आले.
दरम्यान, जळगावसह जिल्हाभरातील विविध आगारातील एकूण ७७ कर्मचारी ३१ मे रोजी परिवहन महामंडळाच्या सेवेतून निवृत्त झाले. या कर्मचाऱ्यांचा आगार प्रशासनातर्फे सपत्नीक सत्कार करण्यात येऊन त्यांची आगार परिसरातून एस.टी.तून वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली.