घुसर्डी येथील शेतकऱ्याची केळी इराण देशात रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:12 IST2021-07-11T04:12:25+5:302021-07-11T04:12:25+5:30
भडगाव : तालुक्यातील घुसर्डी येथील आदर्श शेतकऱ्याने आपला केळीचा बगीचा मेहनतीने चांगला फुलविला आहे. आपली केळी ...

घुसर्डी येथील शेतकऱ्याची केळी इराण देशात रवाना
भडगाव : तालुक्यातील घुसर्डी येथील आदर्श शेतकऱ्याने आपला केळीचा बगीचा मेहनतीने चांगला फुलविला आहे. आपली केळी थेट विदेशातील बाजारात पाठविली आहेत. त्यामुळे कधी काळी केळीचे माहेरघर असलेल्या कजगावात पुन्हा केळीला या प्रयोगशील शेतकऱ्यांमुळे सुगीचे दिवस आले आहेत.
घुसर्डी येथील शेतकरी गोकुळ कपूरचंद परदेशी यांनी आपल्या दोन एकर क्षेत्रात तीन हजार केळीच्या खोडाची लागवड केली आहे. साधारण या सर्व केळीचा माल निघेपर्यंत एक ते दीड लाख रुपये खर्च झाला आहे. तर या संपूर्ण केळी पिकातून त्यांना खर्चवजा करून आठ लाख रुपये निव्वळ नफा मिळणार आहे.
स्थानिक बाजारभावापेक्षा तब्बल २०५ रुपये जास्त भाव त्यांना मिळाला आहे. त्यांनी घेतलेल्या केळी पिकाचे संपूर्ण परिसरात कौतुक होताना दिसत आहे. कधी काळी संपूर्ण राज्यात नव्हे तर देशात कजगाव व परिसरातील केळीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. मात्र कधी बाजारात भाव मिळाला नाही, तर कधी निसर्गाने साथ दिली नाही. अनेक वेळा शासनाची उदासीन भूमिका ही केळी लागवडीत घट होण्यास कारणीभूत ठरली, असे अनेक काळानुरूप बदल झाले. त्यामुळे कजगाव परिसरातील केळीची लागवड मोठ्या प्रमाणावर कमी झाली होती. मात्र परदेशी यांनी केलेला यशस्वी प्रयोग आता अनेक केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरत आहे.
गोकुळ परदेशी यांना या केळी लागवडीसाठी कृषितज्ज्ञ राकेश थोरात यांचे मार्गदर्शन लाभले. गिरणा काठावर केळी पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड शेतकऱ्यांनी सुरूच ठेवली आहे. मोठ्या कष्टाने केळीचा बगीचा अनेक शेतकऱ्यांनी फुलवत चांगले उत्पन्नही घेत आहेत. यापूर्वीही वाडे, वडधे, पथराड यासह काही गावांतील शेतकऱ्यांनी आपला केळीचा माल इराण व अफगाणिस्तानला कंपनीमार्फत दिला आहे.
बाजारपेठ, खासगी, व्यापारी, केळी मालाला देत असलेल्या भावापेक्षा जादा भाव मिळत आहे. त्यामुळे आता शेतकरी चांगला क़्वालिटीचा केळी माल फुलवित विदेशात पाठवित आहेत.
काही वर्षांपूर्वी कजगाव परिसरातील केळीला विशेष महत्त्व होते. मात्र, जसजसा काळ पुढे जात राहिला, तसतशी कजगावच्या केळीचे महत्त्व कमी होत गेले. त्याला शासनासह निसर्गानेही साथ दिली नाही. त्यामुळे आम्ही नवीन प्रयोग करून थेट इराण या देशातील बाजारात केळी पाठवली आहे. त्यामुळे येथील बाजारभावापेक्षा चांगला भाव मिळाला आहे.
- गोकुळ परदेशी, केळी बागायतदार शेतकरी, घुसर्डी, ता. भडगाव
शासनाने केळी लागवड वाढावी, म्हणून केळीला फळाचा दर्जा द्यावा व केळीला हमीभाव देऊन शेकऱ्यांना सहकार्य करावे. त्यामुळे कजगाव व परिसरातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना पुन्हा सुगीचे दिवस येतील व केळी लागवडीत मोठा बदल होईल.
- राकेश थोरात, कृषितज्ज्ञ, कजगाव
100721\10jal_1_10072021_12.jpg
घुसर्डी येथे केळीचा माल पॅकींग होताना शेतकरी. (गोकुळ परदेशी)