भूता परस्परे जडो.. मैत्र जीवांचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 13:23 IST2020-06-05T13:22:38+5:302020-06-05T13:23:02+5:30
साधुसंत येती देवा तुज्या दर्शनाला!! अवघे जेणे पाप नासे! ते हे असे पंढरीसी!! गातजागा गातजागा ! प्रेम मागा विठ्ठलासी ...

भूता परस्परे जडो.. मैत्र जीवांचे
साधुसंत येती देवा तुज्या दर्शनाला!!
अवघे जेणे पाप नासे! ते हे असे पंढरीसी!!
गातजागा गातजागा ! प्रेम मागा विठ्ठलासी
अवघी सुखाची राशी ! पुंडलिकाशी ओळली !!
तुका म्हणे जवळी आले ! ऊभे ठेले समचरणी !!
खान्देशातील वारकऱ्यांना आषाढ महिना कधी लागतो आणि आपण पंढरीच्या पायी वारीत दिंडी सोहळ्यात पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ लागते. तत्पूर्वी पंढरीचा वारकरी हाच शेतकरीसुद्धा आहे तो शेतकरी आता जेष्ठ महिन्यात आपली शेती नांगरून तयार करून पावसाची प्रतिक्षा करतो. पहिला व दुसरा पाऊस वेळेवर झाला म्हणजे पेरणी करतो आणि मग तोच शेतकरी राजा पंढरपुरचा पायी वारकरी म्हणून खांदेशातून निघणार्या दिंडीमध्ये सामिल होण्यास सज्ज होतो. १८६ वर्षाची जुनी परंपरा असलेली झेंडूजी महाराज बेळीकर संस्थानच्या पायी दिंडीला दरवर्षी वटपौर्णिमैला कुंडलेश्वर येथून सुरूवात होत असते. या प्रस्थान सोहळ्यासाठी कुंडलेश्वर येथे वारकरी, माळकरी, विणेकरी, भालदार, चोपदार, टाळकरी, तुळशी कलशधारी, झेंडेकरी, मृदूंगवादक, किर्तनकार, गायक, असे वारकरी स्त्री-पुरूष एकत्र येतात, ते दिंडीत पायी जाण्यासाठी येतात. तसेच त्यांना निरोप देण्यासाठी वारकरी सांप्रदायाचे प्रमुख वक्ते राजकिय, सामाजिक व धार्मिक कार्य करणारे लोक प्रस्थानाच्यावेळी उपस्थित असतात. त्यावेळी संतांची शिकवण आत्मसात केलेली असते, म्हणून प्रत्येक मनुष्यात तो पांडूरंग दिसतो म्हणून भेटताक्षणी तेथे नाव-गाव न विचारता एकमेकांना माऊली संबोधतात आणि एकमेकांच्या पाया पडतात. लहान-थोर, श्रीमंत-गरिब कोणताही भेदभाव न करता आजोबासुद्धा बालकांच्या पाया पडत असतात. चला तर मग ज्ञानोबा तुकाराम-ज्ञानोबा तुकाराम असा गजर घरी राहूनच करु या..
-गोपाळ ढाके, भादली बुद्रुक ता.जळगाव.