गणपती आरास साहित्याने फुलली बाजारपेठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:22 IST2021-09-08T04:22:04+5:302021-09-08T04:22:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सध्या गणेशोत्सवाची तयारी वेगाने सुरू आहे. संपूर्ण बाजारपेठ गणेशोत्सवाच्या आरास साहित्याने फुलली आहे. त्यात ...

गणपती आरास साहित्याने फुलली बाजारपेठ
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : सध्या गणेशोत्सवाची तयारी वेगाने सुरू आहे. संपूर्ण बाजारपेठ गणेशोत्सवाच्या आरास साहित्याने फुलली आहे. त्यात विविध रंगांच्या माळा, नव्या पद्धतीचे झिरमाळ्या असलेले पडदे यांचा समावेश आहे. गणेशाची आरास तयार करण्यास उत्सुक असलेली लहान मुले या वस्तू घेण्यासाठी हट्ट करत आहेत. तसेच घरात मूर्ती कोणत्या आकाराची असावी, यानुसार घराघरात आरास साहित्य घेतले जात आहे.
व्यापारी मोतीलाल चंदीरमानी यांनी सांगितले की, सध्या बाजारात मेड इन इंडिया प्रॉडक्टचीच चलती आहे. त्यामुळे भाव देखील काहीसे वधारलेले आहेत. दरवर्षी प्रमाणे फुलांच्या माळा, कृत्रिम विविध रंगांची फुले, कृत्रिम लहान आकारातील गवताचे सेट आरास साहित्यासाठी उपलब्ध आहे.
मूषक आला हत्तीवर !
पूर्वी आरास करण्यासाठी बाजारात विविध कागदी साहित्य मिळत होते. त्याची जागा नंतर प्लास्टिकच्या साहित्याने घेतली. आता मातीच्या विविध मूर्ती देखील आरास साहित्य म्हणून घेतल्या जात आहे. गणेश मूर्ती बनवणारे मूर्तिकार, तसेच विविध दुकानांमध्ये या मातीच्या किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती मिळत आहे. या मूर्तीमध्ये मूषकाला हत्तीवर बसवून तसेच विविध रुपांमध्ये दाखवण्यात आले आहे. या लहान मूर्तींना सध्या चांगलीच मागणी दिसून येत आहे.
बाल गणेशाची मागणी वाढली
गेल्या काही वर्षांपासून बाल गणेशाच्या मूर्तीची मागणी वाढली आहे. भाविकांकडून घरी बसवण्यासाठी बाल गणेश तसेच विविध रंगांचे फेटे असलेल्या गणेशमूर्तींची मागणी चांगलीच वाढली आहे. यात ६०० रुपयांपासून ६ हजारापर्यंतच्या मूर्ती उपलब्ध आहेत. त्यातही शाडू माती आणि तुरटीच्या गणेश मूर्ती तसेच इतर पर्यावरण पूरक वस्तूंपासून बनवलेल्या मूर्तींना बाजारात चांगली मागणी आहे. तुरटी आणि शाडू मातीपासून बनवलेल्या मूर्तींची किंमत जास्त असते तसेच आकार देखील कमी असतो.