लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या काही दिवसांमध्ये मिठाईच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे. गणरायाच्या आगमनासोबत मिठाईचे दरदेखील वधारले आहे. सध्या बाजारात ज्या केशरी पेढ्याचे मोदक बनतात, त्या केशरी पेढच्याच्या दरात प्रतिकिलो २० रुपयांनी वाढ झाली आहे तर इतर मिठाईच्या दरातदेखील साधारणतः दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहक मिठाईच्या चवीकडे न बघता खिशाकडे बघूनच खरेदी करत आहेत.
गणेशोत्सवात मोदकांना जेवढी मागणी असते, तेवढीच मागणी जळगावकर विविध आकाराच्या गोड मिठाईंची करतात. यंदा दरवाढीमुळे मिठाई खरेदी जपून केली जात आहे.
मिठाईचे दर प्रतिकिलो
काजू कतली
सध्याचे दर १२०० ते १४०० रुपये प्रतिकिलो
आधीचे दर १००० रुपये प्रतिकिलो
केशरी पेढा
सध्याचे दर ४४० रुपये प्रतिकिलो
आधीचे दर ४२० रुपेय प्रतिकिलो
कलाकंद
सध्याचे दर ४८० रुपये प्रतिकिलो
आधीचे दर ४४०
लाडू
सध्याचे दर - ४८० रुपये
आधीचे दर ४४० रुपये
का वाढले दर?
गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर वाढले आहे. आधी १३०० रुपयांना मिळणारे व्यावसायिक गॅस सिलिंडर आता १६२० रुपयांना मिळत आहे. तसेच इतर कच्च्या मालाच्या दरातदेखील वाढ झाली आहे. दुधाच्या दरात काही महिन्यांपासून वाढ झाली आहे. त्यासोबतच ड्रायफ्रूट मिठाईसाठी लागणाऱ्या सुकामेव्याच्या दरातही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे मिठाईचे दर वाढले हे स्वाभाविक आहे. - भाविक मदानी, मिठाई विक्रेते
भेसळीवर लक्ष ठेवा ?
सणासुदीच्या काळात मिठाई घेताना नागरिकांनी भेसळीकडे लक्ष द्यावे. तसेच विविध पदार्थांची गुणवत्ता तपासून मगच घ्यावे. चांदीच्या वर्खामध्ये सर्टिफाइड असावा, तसेच भडक रंगावरूनदेखील ओळखता येते. सणांच्या काळात भेसळ विरोधात मोहीम सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम ३१ डिसेंबरपर्यंत सुरू राहील, अशी माहिती अन्न व औषध विभागाचे निरीक्षक विवेक पाटील यांनी दिली.
ग्राहक म्हणतात...
सध्या बाजारात सर्वच वस्तूंचे दर वाढले आहे. यावेळी मिठाई खूपच कमी घेतली आहे. काही वेगळे पदार्थ घरीच करून घेऊ. वाढलेल्या दरांमुळे मिठाई खरेदी करण्याची इच्छा होत नाही. - देवांश राजपूत
सणांच्या काळात भाववाढ ही जाणीवपूर्वक केली जाते. त्यामुळे ग्राहक कोंडीत सापडतो. आधीच महागाईचा भडका उडाला आहे. खाण्याच्या वस्तूंचे दर वाढल्याने नागरिकांनी काय करावे. - किशोर कोळी