गणरायाच्या मूर्ती संकलनासाठी मनपा प्रशासनातर्फे शहरातील चार प्रभागांमध्ये २८ मूर्ती संकलन केंद्र तयार करण्यात येणार आहेत. प्रत्येक प्रभागातील मनपाच्या शाळांमध्ये व इतर सार्वजनिक हे केंद्र असणार आहेत. तसेच निर्माल्य संकलनासाठी मनपाचे सहा वाहने शहरात प्रत्येक प्रभागांमध्ये जाऊन निर्माल्य संकलन करणार आहेत. विशेष म्हणजे मूर्ती संकलन केंद्रावरही निर्माल्य संकलनासाठी व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळातर्फेही नागरिकांनी त्यांच्या भागातील गणेश मंडळांच्या ठिकाणी मूर्ती व निर्माल्य संकलनाचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, संकलित केलेल्या निर्माल्यावर छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात प्रक्रिया केली जाणार आहे.
इन्फो :
तलावावर सात तराफे व लाईफ बोटही सज्ज
मेहरूण तलावावर सर्व प्रकारची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. यामध्ये सात तराफे बनविण्यात आले असून, तलावावर लाईफ बोटचींही व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मनपा व जिल्हा आपत्ती विभाागाची यंत्रणाही मेहरूण तलावावर तैनात राहणार आहे. रात्रीच्या वेळी महावितरणतर्फे सुसज्ज अशी पथदिव्यांची व्यवस्थाही करण्यात आली आहे. दरम्यान, तलाव परिसरात इतर नागरिकांना बंदी राहणार असून, मेहरूण तलावाकडे येणाऱ्या सात रस्त्यांवर बॅरिकेट्स लावली जाणार आहेत.
इन्फो :
महावितरणच्या कर्मचाऱ्यानांही सतर्क राहण्याच्या सुचना
यंदा विसर्जन मिरवणुक नसली तरी, अनेक गणेश मंडळे ट्रक्टर किंवा ट्रकवर गणरायाला विसर्जनासाठी मेहरूण तलावावर नेत असतात. मात्र, काही ठिकाणी रस्त्यांमध्ये लोंबकळलेल्या वीज जोडणीच्या विद्युत वाहिनी किंवा तारा अडथळा ठरत असतात. त्यामुळे त्या-त्या भागातील महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी मंडळांना अशा प्रकारे कुठेही अडथळा आल्यास, त्या ठिकाणी तात्काळ पोहचून मंडळांना सहकार्य करण्याच्या सुचना महावितरणतर्फे कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.