विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 21:17 IST2025-09-06T21:16:51+5:302025-09-06T21:17:13+5:30
तरुणाचा नदीपात्रात शोध घेतला जात आहे...

विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला...
विजयकुमार सैतवाल -
जळगाव : गणपती विसर्जनासाठी गेलेला गणेश गंगाधर कोळी (२५, रा. ममुराबाद, ता. जळगाव) हा तरुण गिरणा नदीपात्रामध्ये वाहून गेला. या तरुणाचा नदीपात्रात शोध घेतला जात आहे. ही घटना शनिवारी (६ सप्टेंबर) संध्याकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास निमखेडी शिवारात नवीन बायपास लगत घडली.
अनंत चतुर्दशीला, ६ सप्टेंबर रोजी लाडक्या बाप्पाला सर्वत्र निरोप दिला जात असताना ममुराबाद येथील कोळी कुटुंबदेखील घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यासाठी निमखेडी शिवारात गिरणा नदी पात्रामध्ये गेले होते. या ठिकाणी गणेश कोळी हा तरुण गणपती मूर्ती घेऊन नदीपात्रात गेला. त्यावेळी त्याला पाण्याचा अंदाज आला नाही. त्यात गिरणा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने पाण्याचा प्रवाह वेगात आहे. त्यामुळे गणेश कोळी हा तरुण पाण्यात बुडाला व बेपत्ता झाला.
घटनास्थळी तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अनंत अहिरे, पोलिस नाईक प्रकाश चिंचोरे, पोलिस कॉन्स्टेबल प्रशांत ठाकूर हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आपत्ती व्यवस्थापन व अन्य विभागांना माहिती देऊन दिली. तरुणाचा नदीपात्रामध्ये शोध घेतला जात आहे.
आई, वडील व कुटुंबातील अन्य सदस्यांच्या डोळ्या समोर गणेश हा नदीपात्रात बुडाल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे.