गणराय आले घरी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:22 IST2021-09-10T04:22:33+5:302021-09-10T04:22:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गणेश चतुर्थीपासून गणपती बाप्पा दहा दिवस घरी राहायला येणार, आता सारेच जण लाडक्या गणेशाच्या ...

गणराय आले घरी !
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गणेश चतुर्थीपासून गणपती बाप्पा दहा दिवस घरी राहायला येणार, आता सारेच जण लाडक्या गणेशाच्या स्वागतासाठी तयार आहेत. गुरुवारी सर्वांनी बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. अनेकजण गणेशाची मूर्ती विकत घेत होते, तर अनेक जण बाजारात मखर आणि आरास साहित्य, दहा दिवस प्रसादाचे वेगवेगळे साहित्य यांची खरेदी करण्यात व्यस्त झाले होते. गेल्यावर्षी बाजारालादेखील वेळेचे बंधन होते. मात्र यंदा वेळेचे बंधन नसल्याने बाजारात मोठी गर्दी उसळली होती.
प्रसाद साहित्याची मोठी खरेदी
गणपती बाप्पाला मोदक फार आवडतात. खान्देशात उकडीचे मोदक बनवले जात नाही. मात्र त्याऐवजी खोबऱ्याचा किस घालून तयार केलेले मोदक प्रसादात ठेवले जातात. त्यामुळे गेल्या आठवड्याभरापासून खोबऱ्याला मोठी मागणी आहे. तसेच विविध रंगांचे पेढे मोदकाच्या आकारात तयार करून त्यांचा प्रसादात वापर केला जातो. त्यामुळे सध्या मिठाई विक्रेत्यांकडे ४८० रुपये प्रतिकिलो दरापासून मिठाईच्या आकारातील मोदक विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
आरास साहित्याची विक्री
घरीच आरास तयार करणाऱ्यांसाठी आज खरेदीसाठी शेवटचा दिवस होता. शुक्रवारी गणपती बाप्पा येणार असल्याने भाविकांनी विविध रंगांचे आरास साहित्य घेण्यासाठी गर्दी केली होती. अनेकजण आधीच साहित्य खरेदी करून घरी आरास करण्यात व्यस्त होते. त्यात अनेकांनी गणपती बाप्पाच्या मखराला रोषणाई करण्यासाठी विद्युत माळादेखील विकत घेतल्या. त्यांचेही दर यंदा ५० रुपयांपासून पुढे होते.
टॉवर चौक गर्दीने फुलला
गुरुवारी सकाळपासूनच टॉवर चौकात मोठी गर्दी होती. दुपारनंतर मूर्ती घेण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करत होते. याठिकाणी गणेशमूर्ती विक्रीसाठी सोय करून देण्यात आली आहे. त्यामुळे शहरातून मूर्ती विकत घेण्यासाठी नागरिक येथे येत होते. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी टॉवर चौकाकडून जिल्हा परिषदेकडे जाणाऱ्या रस्त्यावर मध्यभागी दुकाने लावण्यात आली होती.
गणेशमूर्तींचे भाव गगनाला
यंदा अर्धा फुटापासून त्यापुढे उंचीच्या मूर्ती बाजारात उपलब्ध आहेत. मात्र यंदा फक्त अर्धा फुटाच्या आकाराच्या मूर्तींची किंमतच २०० रुपयांपासून पुढे सुरू होत आहे. त्याशिवाय शाडू मातीच्या लहान आकाराच्या मूर्ती बाजारात ५०० रुपयांपासून सुरू आहे तर तुरटी आणि इतर पर्यावरणपूरक मूर्तींची किंमतदेखील जास्त आहे.
गणेश कॉलनी, गुजराल पेट्रोलपंप, महाबळ चौक गर्दीने फुलले
शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती. त्यासोबतच महाबळ चौक, गणेश कॉलनी आणि गुजराल पेट्रोलपंप, पिंप्राळा यासारख्या उपनगरांमध्ये असलेल्या बाजारातदेखील गणेशमूर्ती आणि इतर आरास साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी उसळली होती. या ठिकाणीदेखील मूर्ती, प्रसादाचे साहित्य, सजावट साहित्याची दुकाने मोठ्या प्रमाणात लागली होती.