लॉकडाऊनच्या संभ्रमामुळे दिवसभर दुकाने बंद-सुरू ठेवण्याच्या खेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:16 IST2021-04-07T04:16:15+5:302021-04-07T04:16:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राज्य व जिल्हा प्रशासनाच्या लॉकडाऊनबाबतच्या नियमावलीबाबत शहरातील व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था असल्याने मंगळवारी शहरातील प्रमुख मार्केटमध्ये ...

लॉकडाऊनच्या संभ्रमामुळे दिवसभर दुकाने बंद-सुरू ठेवण्याच्या खेळ
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राज्य व जिल्हा प्रशासनाच्या लॉकडाऊनबाबतच्या नियमावलीबाबत शहरातील व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था असल्याने मंगळवारी शहरातील प्रमुख मार्केटमध्ये दिवसभर दुकाने बंद व सुरू असल्याचा खेळ सुरू होता. शहरातील महात्मा फुले मार्केटमध्ये सकाळी दहा वाजेच्या सुमारास अनेक दुकानदार आले; मात्र काही जणांनीच दुकाने उघडली, तर काहींनी दुकाने बंद ठेवून दुकानासमोर उभे असल्याचे दिसून आले. गोलाणी मार्केटमध्ये काही दुकानदारांनी कारवाईच्या भीतीने अर्धवट स्वरूपात दुकाने उघडून ठेवली होती, तर काही जणांनी पूर्णपणे दुकाने उघडी ठेवून व्यवसाय केला.
राज्य शासनाने रविवारी आदेश काढून अत्यावश्यक दुकाने वगळता सर्व प्रकारची दुकाने बंदचे आदेश काढले होते. त्यावर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जळगाव जिल्ह्यात काय बंद आणि काय सुरू राहणार याचे सोमवारी आदेश काढणे गरजेचे होते. मात्र, त्याबाबत स्पष्ट आदेश नसल्याने मंगळवारी दुकाने उघडायची की बंद ठेवायची याबाबत व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मंगळवारी सकाळी दहा वाजता फुले मार्केट, गोलाणी मार्केटसह शहरातील इतर मार्केटमध्ये देखील व्यापारी नेहमीच वेळेवर आले. मात्र, दुकाने उघडण्याबाबत अनेक व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम असल्याने ठराविकच दुकाने वेळेवर उघडलेली दिसून आली. दुकाने उघडली तर मनपाकडून कारवाई होण्याची शक्यता असल्याने अनेकांनी आधी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यानंतरच फुले मार्केटमध्ये दुकाने उघडण्यात आली. मात्र, दिवसभर कारवाईच्या भीतीने दुकाने सुरू - बंद असा खेळ सुरू असल्याचे दिसून आले.
पोलिसांनी दुकाने केली बंद, मात्र आदेश नसल्याने पुन्हा केली सुरू
शहरातील व्यापाऱ्यांसोबतच पोलीस प्रशासनामधील कर्मचारी देखील निर्णयाबाबत संभ्रमात दिसून आले. मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास पोलिसांनी शहरातील मुख्य बाजारपेठेत पाहणी केली. या पाहणी दरम्यान अनेक दुकाने उघडी असल्याने पोलिसांनी दुकाने बंद करण्याचे आदेश दिले. पोलिसांच्या आदेशानंतर गोलाणी मार्केट, फुले मार्केटसह शहरातील मुख्य बाजारपेठ भागातील अनेक दुकानदारांनी दुकाने बंद करून ठेवली. मात्र, जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही सूचना नसल्याने नंतर पोलिसांनीच आदेश येईपर्यंत दुकाने सुरू ठेवली तरी चालतील, असे सांगत पुन्हा दुकाने उघडण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर मात्र दुकाने पुन्हा सुरू झाली.
मनपाचे पथक आल्यानंतर पुन्हा दुकाने झाली बंद
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांविरोधात मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून कारवाई केली जात आहे. त्यामुळे मनपाचे पथक दिवसभर मुख्य बाजारपेठ भागात सातत्याने पाहणी करत असते. मंगळवारी महापालिकेचे पथक फुले मार्केट परिसरात दुपारी दोन वाजेच्या सुमारास पोहोचल्यानंतर कारवाईच्या भीतीने जवळजवळ सर्वच दुकानदारांनी दुकाने बंद करून घेतली होती. मात्र, जिल्हा प्रशासनाकडून सुरू असलेल्या दुकानांवर कोणतीही कारवाई करण्याबाबत आदेश नसल्याने महापालिकेकडून कोणत्याही दुकानावर कारवाई करण्यात आली नाही. मात्र, महापालिकेच्या पथकाकडून प्रत्येक दुकानामध्ये गर्दीबाबत पाहणी करण्यात आली.