व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आला अंत्यविधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 18:12 IST2020-04-06T18:11:34+5:302020-04-06T18:12:00+5:30
मुलगा परदेशात : नातेवाईकाकडून दुरुनच सांत्वन

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आला अंत्यविधी
भुसावळ : येथील रहिवासी व सेवानिवृत्त रेल्वे लोको पायलट राजेश प्रभाकर शेळके (५९) यांचे २७ मार्च रोजी रात्री हृदयविकाराने निधन झाले. मात्र देशात संचारबंदी असल्याने आॅस्टेलियातील मुलगा येथे येऊ शकत नसल्याने त्यांच्यावर अंत्यंस्कार व दशक्रियाविधी करताना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुलासह नातेवाईकांनी सहभाग दिला.
राजेश शेळके यांचे निधन झाल्यानंतर भुसावळ येथे कोरोना संशयित रुग्णाचा मृत्यू झाल्याची जोरदार अफवा पसरली होती मात्र अहवालानंतर कोरोनामुळे मृत्यू झाला नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर २८ रोजी जळगाव येथे अंत्यसंस्कार करण्याचे ठरले. मात्र संचारबंदीमुळे मुलगा आशुतोष शेळके हा आॅस्ट्रेलिया (मेलबर्न) येथे असल्यामुळे तो येऊ शकणार नव्हता ही बाब लक्षात घेता पत्नी संध्या शेळके, मुलगी प्रियंका व जावई सारंग भाटिया व व्याही अशोक भाटिया यांनी २८ रोजी संध्याकाळी जळगाव येथील स्मशान अंत्यसंस्कार केले. मुलगी प्रियंकाने अग्नी डाग दिला. मुलगा आशुतोषला व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वर अंत्यविधी दाखविण्यात आला.
दशक्रिया विधीलाही
व्हिडिओ कॉन्फरन्सिंग
शेळके यांचा दशक्रिया विधी ५ एप्रिल रोजी झाला. नातेवाईकांनाही येणे शक्य होणार नसल्याचे मुलगा आशुतोष आॅस्ट्रेलिया (मेलबर्न) व सून सोनम (बेल्जियम) यांनी ५ रोजी सकाळी १०:३० ते १२ या वेळेमध्ये इंटरनेटचा वापर करत झुम मिटिंग या अॅपद्वारे सिंगापूर, बेल्जियम, आॅस्ट्रेलिया, पुणे-बंगलोर, नाशिक, मुंबई डेहराडून या सर्व नातेवाईकांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे एकत्रित केले व दशक्रिया विधीही पार पडला. सर्व नातेवाईकांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच सात्वंन केले. दरम्यान दशक्रिया विधी साधा केल्याने संचारबंदीत गरजूंना अन्नदान करण्यात आले.