रेल्वे अभियंत्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 17:25 IST2018-12-03T17:22:50+5:302018-12-03T17:25:56+5:30
भुसावळ रेल्वेत इंजिनियर असलेल्या आणि झाशी येथे लष्करी प्रशिक्षणासाठी गेलेल्या संदीप कोल्हे नामक जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. या जवानावर सोमवारी सकाळी साकरी येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

रेल्वे अभियंत्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार
भुसावळ : तालुक्यातील साकरी येथील रहिवासी व रेल्वेत इंजिनिअर पदावर असलेल्या तरुणाचे झाशी येथे लष्करी प्रशिक्षणासाठी गेल्यानंतर हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याची घटना रविवारी रात्री घडली.
संदीप युवराज कोल्हे असे मयत जवानाचे नाव आहे. संदीप हा गेल्या १६ दिवसांपासून झाशी येथे ९७० इंजिनिअरींग बटालियनमध्ये लष्करी प्रशिक्षण घेत होता. रविवारी रात्री जेवण झाल्यानंतर त्यास अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. साकरी येथे याबाबतची माहिती कळल्यानंतर शोककळा पसरली. सोमवारी पहाटे त्याचा मृतदेह आणल्यानंतर सकाळी आठ वाजेच्या सुमारास त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
संदीप याच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली , भाऊ, बहीण, भावजयी असा परीवार आहे. अंत्यसंस्कारावेळी गावातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.