निर्बंधाचे नाव बदलून व्यापाऱ्यांची फसगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:16 IST2021-04-06T04:16:02+5:302021-04-06T04:16:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना नियंत्रणासाठी राज्य सरकारने ४ एप्रिल रोजी काढलेल्या आदेशामुळे व्यापारी वर्ग संभ्रमात पडला आहे. ...

निर्बंधाचे नाव बदलून व्यापाऱ्यांची फसगत
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना नियंत्रणासाठी राज्य सरकारने ४ एप्रिल रोजी काढलेल्या आदेशामुळे व्यापारी वर्ग संभ्रमात पडला आहे. नेमके काय सुरू राहील आणि काय बंद राहणार याविषयी सोमवारी सकाळपासून जळगावातील व्यापार क्षेत्रात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या तसेच लॉकडाऊनच्या विचाराने सर्वच चिंतित झाले. राज्य सरकारने आता या निर्बंधांना लॉकडाऊन न म्हणता ब्रेक द चैन असे नाव देत फसगत करीत असल्याचा आरोप देखील केला जात आहे.
गेल्यावर्षी कोरोना संसर्गामुळे ओढावलेल्या लॉकडाउन मधून सावरत नाही तोच आता पुन्हा राज्य सरकारने ४ एप्रिल रोजी नवीन आदेश जारी केले. मात्र या आदेशात स्पष्टता नसल्याने सकाळपासूनच व्यापारी संभ्रमात होते. शनिवार-रविवार पूर्ण व्यवसाय राहणार असे राज्य सरकारने म्हटले असून इतर दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे कारण काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. सरकार लॉकडाऊन असे म्हणत नसले तरी या आदेशानुसार ८० टक्के व्यवहार बंद राहणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. सरकारने लॉकडाऊन असा उल्लेख न करता ब्रेक द चैन असे नवीन नाव देऊन व्यापाऱ्यांची फसगत केली असल्याचा आरोप देखील केला जात आहे.
राज्य सरकारचे हे आदेश गेल्या वर्षांपेक्षा कठीण असून आता २५ दिवस व्यवहार बंद ठेवायचे म्हणजे व्यावसायिकांसह त्यांच्याकडे काम करणाऱ्यांनी कसे जगावे असा प्रश्न उपस्थित केला आहे. सरकारच्या या निर्णयाने व्यापारीवर्ग नष्ट होत असल्याचा आरोप देखील करण्यात आला.
--_-----------
राज्य सरकारने काढलेले आदेश संभ्रमात टाकणारे असून काय सुरू राहील, काय बंद राहणार याविषयी स्पष्टता नाही.
- पुरुषोत्तम टावरी, वरिष्ठ उपाध्यक्ष, कॅट
आता लॉकडाऊन केल्यास व्यावसायिकांसह आमच्याकडे काम करणाऱ्या व्यक्तींनी कसे जगावे, असा प्रश्न निर्माण होतो. या विषयी सरकारने विचार करून निर्णय घ्यावा.
- रिकेश गांधी, व्यावसायिक
राज्य सरकारने काढलेल्या आदेशात कोठेही स्पष्टता नसल्याने हॉटेल सुरू ठेवावे की नाही हे समजत नाही. शनिवार, रविवार संपूर्ण बंद राहणार असेल तर पार्सल सुविधांचे काय याविषयी स्पष्टता नाही.
- लेखराज उपाध्याय, अध्यक्ष, जळगाव हाॅटेल असोसिएशन
गेल्या वर्षाच्या लॉकडाउन मधून आता सावरत असताना आता पुन्हा राज्य सरकारने काढलेल्या आदेशाने चिंता वाढली आहे. सरकारने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करीत असून सरकारने अर्थचक्र विषयी विचार करावा.
- ललित पाटील, अध्यक्ष, जळगाव जिल्हा वाइन असोसिएशन.