चार महिन्यांचा साठवलेला, अळ्या पडलेला माल पोषण आहारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 12:17 IST2019-07-27T12:17:09+5:302019-07-27T12:17:36+5:30
चौकशीत उघड झाला प्रकार

चार महिन्यांचा साठवलेला, अळ्या पडलेला माल पोषण आहारात
जळगाव : कन्हाळे येथील जिल्हा परिषद शाळेत पोषण आहारातून विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यानंतर व या प्रकरणी कारवाई झाल्यानंतर निकृष्ट पोषण आहाराचा मुद्दा ऐरणीवर आला़ दरम्यान, या शाळेने चार महिन्यांचा साठवून ठेवलेला माल कुठलीही स्वच्छता न करता विद्यार्थ्यांच्या आहारासाठी वापरल्याचा धक्कादायक प्रकार चौकशीतून समोर आला आहे़ त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत़
़जिल्हा परिषदेच्या कन्हाळे येथील शाळेमध्ये ९ विद्यार्थ्यांना भोजनातून विषबाधा झाली होती़ याप्रकरणाच्या चौकशीसाठी शिक्षणाधिकारी डी़ एम़ देवांग यांनी गटशिक्षणाधिकारी, रावेर येथील शालेय पोषण आहार अधीक्षक व जिल्हा परिषदेचे लेखाधिकारी या तीन सदस्यांची चौकशी नेमली होती़ या समितीने चौकशी करून गुरुवारी आपला अहवाल जिपचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी संजय मस्कर यांच्याकडे सादर केला आहे. यामध्ये भुसावळ तालुक्यातील ४२ शाळांपैकी २० शाळांमध्ये निकृष्ट दर्जाचे धान्य आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता़ पल्लवी सावकारे यांनी शिक्षण समिती बैठकीतही हा मुद्दा उपस्थित करून संबधित शाळांवर कारवाईची मागणी केली होती़ पोषण आहाराचा माल उतरविताना पन्नास दिवसांचा मालच उतरवावा, असे नियम आहेत मात्र, तरीही कन्हाळे शाळेने चार महिन्यांपासून हा माल घेऊन ठेवला होता व साठवून ठेवला होता़ त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले असून अन्य शाळांच्या मालाच्याही तपासणीची मागणी होत आहे़
ती फाईल बंद होणार?
पोषण आहाराच्या गैरव्यवहार प्रकरणात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर यांनी अद्याप सीईओंकडे अंतिम अहवाल सादर केलेला नाही़ ३१ जुलै रोजी मस्कर हे सेवानिवृत्त होत असल्याने आता उर्वरित दोन दिवसात या अहवालाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून ही फाईलच बंद होईल की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे़
ठेकेदाराची जबरदस्ती
विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यानंतर पल्लवी सावकारे यांनी या शाळेला भेट देऊन पाहणी केली असता तांदूळ व डाळीत थेट अळ्या आढळून आल्या होत्या़ शाळेच्या आवारात जेथे पोषण आहार शिजविला जातो तो परिसरही अगदी अस्वच्छ असल्याचेही तेव्हा समोर आले होते़ हा माल आपण नाकारल्यानंतरही ठेकेदाराने जबरदस्तीने दिल्याचे मुख्याध्यापिका पाटील यांनी सांगितल्याचे समजते़ त्यामुळे ठेकेदारावर कारवाई व्हावी, अशी मागणीही या प्रकाणात समोर येत असून आतापर्यंत शालेय पोषण आहारांच्या सर्व प्रकरणात ठेकेदारावर कुठलीही कारवाई होत नसल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे़
गेल्या अडिच वर्षांपासून मी या पोषण आहारासंदर्भात भांडते आहे, आता कुठे कारवाईला सुरूवात झाली आहे़ मुख्याध्यापक व केंद्र प्रमुखांवर तर कारवाई झाली मात्र, याला जबाबदार ठेकेदार व पोषण आहार अधीक्षकांवरही सीईओंनी कारवाई करावी, अशी अपेक्षा आहे़
- पल्लवी सावकारे, जि़ प़ सदस्या