माजी महापौराच्या मुलासह चौघे गोळीबार प्रकरणी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 12:08 PM2020-07-11T12:08:52+5:302020-07-11T12:09:10+5:30

दोन गावठी पिस्तुल जप्त : गुन्हा दाखल होताच चार तासात झाली अटक

Four arrested in shooting case, including former mayor's son | माजी महापौराच्या मुलासह चौघे गोळीबार प्रकरणी अटकेत

माजी महापौराच्या मुलासह चौघे गोळीबार प्रकरणी अटकेत

googlenewsNext

जळगाव : हाणामारी करताना गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार केल्याप्रकरणी माजी महापौर अशोक सपकाळे यांच्या मुलासह चार जणांना अटक करण्यात आली आहे. हाणामारीच्या घटनेनंतर पोलिसांनी अवघ्या ४ तासात या गुन्ह्याचा उलगडा केला आहे. राजू उर्फ बाबू अशोक सपकाळे (रा. क्रांती चौक, शिवाजीनगर), मिलिंद शरद सकट (रा. गेंदालाल मिल), मयूर उर्फ विक्की दीपक अलोने (रा. आर. वाय. पार्क) आणि इम्रान उर्फ इमू शहा रशीद शहा (रा. गेंदालाल मिल) अशी अटक केलेल्यांची नावे आहे.


अटक केलेले संशयित हे गुरुवारी सायंकाळी शहरातील उस्मानिया पार्क परिसरात एका शेतात मद्यपान करीत होते. त्यावेळी त्यांच्या जवळून दोनजण जात होते. तेव्हा मयूर याने त्यांना तुम्ही इकडे कुठे जात आहात, अशी विचारणा करत त्यांच्याशी वाद घातला. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. ही हाणामारी सोडवण्यासाठी आलेल्या सुफियान शकील बेग (रा. शिवाजीनगर, हुडको) याला मयूरने बिअरची बाटली मारून फेकली होती. त्यात सुफियानच्या चेहऱ्याला जखम झाली आहे. या घटनेनंतर मयूर अलोने याने त्याच्याकडील गावठी कट्ट्यातून हवेत दोन राऊंड फायर केले होते. ही घटना घडल्यानंतर उस्मानीया पार्क, शिवाजीनगर तसेच आर. वाय. पार्क परिसरात फायरिंग झाल्याची चर्चा पसरली.

दोन जणांना शिरसोली येथून केली अटक
गोळीबार झाल्यानंतर या चारही जणांनी तेथून पळ काढला़ तर गोळीबार झाल्याची माहिती मिळताच रात्रीच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. नंतर रात्री ११़३० वाजेच्या सुमारास माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा राजू सपकाळे आणि मिलिंद सकट यांना अटक केली़ नंतर मयूर आणि इम्रान या दोघांनी शिरसोलीकडे पळ काढल्याची माहिती पोलिसांना मिळाली़ रात्री २ वाजता त्यांना शिरसोली येथून अटक पोलिसांनी अटक केली़ या गोळीबारीच्या घटनेनंतर घटनास्थळी काही काळ भितीचे वातावरण पसरले होते.

यांनी केली कारवाई
साहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ़नीलाभ रोहन, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण निकम यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक फौजदार वासुदेव सोनवणे, गणेश शिरसाळे, सुधीर सावळे, अक्रम शेख, तेजस मराठे, रतन गिते, विजय निकुंभ, योगेश इंधाटे, सुनील वाणी, प्रणेश ठाकूर, गणेश पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

दोन गावठी कट्टे जप्त
पोलिसांनी या चारही जणांकडून दोन गावठी कट्टे जप्त केले आहेत़ याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना घडल्यानंतर लागलीच तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी हा गुन्हा उघड केला. अवघ्या चार तासात पोलिसांनी संशयितांचा शोध घेऊन अटक केली आहे.

Web Title: Four arrested in shooting case, including former mayor's son

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.