रावेरमधील चोरीप्रकरणी चौघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 15:43 IST2020-09-13T15:42:26+5:302020-09-13T15:43:27+5:30
चोरट्यांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तवली आहे.

रावेरमधील चोरीप्रकरणी चौघांना अटक
रावेर : शहरातील श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील शिवसेनेचे कार्यकर्ते विजय भावसार यांच्या घराच्या अंगणातील आठ हजार ८०५ रु. किमतीचे सिमेंट व बांधकामाची सळई तथा भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन यांच्या कार्यालयाच्या खिडकीतील दोन हजार रुपये किमतीचे कुलर लंपास केलेल्या चोरट्यांना रावेर पोलिसांनी अटक करून मुद्देमाल जप्त केला आहे. या चोरट्यांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तवली आहे.
पोलीस सूत्रांनुसार, श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील रहिवासी विजय गजानन भावसार यांच्या अंगणात पडलेल्या तीन हजार १०५ रुपये किमतीच्या सिमेंटच्या गोण्या व पाच हजार ७०० रू किमतीची १० मि.मी., ८ मि.मी. तथा ०६ मि.मी. आकाराची काँक्रिटची सळई तसेच पद्माकर महाजन यांच्या कार्यालयाच्या खिडकीत लावलेले जुने वापरते दोन हजार रुपये किमतीचे कुलर असा १० हजारांचा ऐवज ९ सप्टेंबर रोजी रात्री आरोपी गणेश ईश्वर महाजन (वय २१), अमन अजय छापरीबंद (वय २२), यश उर्फ फायर सुनील हंसकर (वय २१), आदर्श उर्फ कालू नरेंद्र जावे (वय १६) सर्व रा.रामदेव बाबा नगर, महालक्ष्मी मंदिराजवळ, रावेर यांनी लंपास केला होता.
दरम्यान, विजय गजानन भावसार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवून आरोपींना गजाआड केले. आरोपींनी संपूर्ण १० हजार ८०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक महेंद्र सुरवाडे, पो.कॉ.सुरेश मेढे व तुषार मोरे हे पुढील तपास करीत आहे. या आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस सूूत्रांनी वर्तवली आहे.