रावेर : तालुक्यातील विविध तीन घटनांमध्ये ४ अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्यात आले होते. रावेर पोलिसांनी या चारही अल्पवयीन मुलींना पालकांच्या स्वाधीन केले आहे. एका घटनेत दोन मुलींना दोन मुलांसह ओरिसा येथील जंगलातून ताब्यात घेतले. इंदूर येथून एकीस तर तिसऱ्या घटनेतील मुलीला मध्यप्रदेशातून ताब्यात घेतले.
तालुक्यातील एकाच गावातील दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेत दोन अल्पवयीन मुलांनी या मुलींसह मध्य प्रदेश, गुजरात, जम्मू-काश्मीर, दिल्ली, उत्तर प्रदेश, छत्तीसगड व ओडिशा असा २२ दिवसांचा प्रवास केला. या चौघाही मुला-मुलींचा पाठलाग करीत रावेर पोलिसांनी ओडिशातील मकपदरा जंगलात २० तास दबा धरून त्यांना १२ रोजी ताब्यात घेतले.
रावेर पोलिस स्टेशनला आणले व १४ रोजी पालकांच्या स्वाधीन केले. फौजदार महेंद्र महाजन व पोकॉ. नितीन सपकाळे यांनी ही कारवाई केली. फौजदार तुषार पाटील व फौजदार दीपाली पाटील यांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण व त्यांच्या नातेवाइकांची चौकशी करून शोध लावण्यात हातभार लावला.
आणखी दोन अल्पवयीन मुलींचा लावला तपासरावेर तालुक्यातील दोन गावातील अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याच्या दोन स्वतंत्र गुन्ह्यात फौजदार तुषार पाटील यांनी तपास करीत १३ रोजी इंदूर (मप्र) येथून एका मुलीस ताब्यात घेऊन तिच्या पालकांच्या स्वाधीन केले. दरम्यान, चौथ्या गुन्ह्यातील फूस लावून पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेत फौजदार दीपाली पाटील यांनी १२ रोजी नायर (ता. खकनार मप्र) येथून ताब्यात घेऊन तिच्या पालकांच्या स्वाधीन केले. पळवून नेल्यानंतर या दोघी त्यांच्या नातेवाईकांकडे परतल्या होत्या.
या चारही गुन्ह्यात रावेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. ईश्वर चव्हाण, पोहेकॉ. सुनील वंजारी, पोकॉ. सचिन घुगे, पोकॉ. नितीन सपकाळे, पोकॉ. श्रीकांत चव्हाण, पोकॉ. गौरव पाटील (स्थानिक गुन्हे शाखा जळगाव) यांच्या पथकाने यशस्वी कामगिरी बजावली.