मुलीला देहव्यापारास भाग पाडणाऱ्यांना तिघांना सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 00:50 IST2018-12-17T00:45:16+5:302018-12-17T00:50:21+5:30
चोपडा शहराजवळ एका झोपड्यात अल्पवयीन मुलीला देह व्यापारास भाग पाडणाºया तीन आरोपींना न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

मुलीला देहव्यापारास भाग पाडणाऱ्यांना तिघांना सक्तमजुरी
चोपडा : शहराच्या हद्दीत बिहारमधील अल्पवयीन मुलीकडून देह व्यापार करवून घेणाºया तीन आरोपींना तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व ३ हजार रुपये दंड चोपडा न्यायालयाने ठोठावला.
न्यायालयीन सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, २६ मार्च २०१८ रोजी चोपडा शहर पोलीस स्टेशनला धरणगाव रोडवरील हतनूर कालव्याच्या बाजूला झोपड्यात अल्पवयीन मुलीकडून देह व्यापार करून घेतला जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून, चोपडा पोलिसांनी बनावट ग्राहक व पंच पाठवून धाड टाकली असता तेथे आरोपी सलमा अब्दुल गाजी रा. कलकत्ता, वजीर हाड पश्चिम बंगाल, आकाश अशोक वानखेडे असे व सोबत पीडित बिहार येथील अल्पवयीन मुलगी असे मिळून आले होते. त्यानंतर सहायक फौजदार दत्तात्रय पाटील यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस स्टेशनला आरोपींविरुद्ध कलम ३,४,५ व ६ नुसार अनैतिक देहव्यापार प्रतिबंधक कायदा १९५६ अन्वये गुन्हा दाखल झाला होता.
सदर गुन्ह्याचा प्रथम तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांनी केला. नंतर पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी करून चोपडा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सदर खटला चोपडा न्यायालयात चालला असता एकूण ६ साक्षीदार तपासले . साक्षीदारांची साक्ष व युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश ग.दी. लांडबळे यांनी १४ रोजी तिन्ही आरोपितांना दोषी धरीत विविध कलमान्वये तीन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व २ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
सदर प्रकरणात सरकारी वकील गजानन खिल्लारे यांनी सरकारी पक्षातर्फे भक्कम बाजू मांडली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे व पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांनी प्रकरणाचा शेवटपर्यंत पाठपुरावा केला.