संजय सोनार
चाळीसगाव : अतिवृष्टी व मुसळधार पावसामुळे तितूर-डोंगरी नदीला आलेल्या महापुरामुळे चाळीसगाव शहरासह नदीकाठच्या अनेक गावांना मोठा फटका बसला. आता पूर ओसरला असला तरी या लोकांपुढील अनेक समस्या आजही कायम आहेत. आजही अनेकांचा संसार उघड्यावरच पडून आहेत. अशा अवस्थेत प्रशासनाने मदत करावी याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. मात्र, प्रत्यक्षात ‘सरकारी काम आणि बारा महिने थांब’ अशी अवस्था निर्माण झाली आहे.या घटनेला तेरा दिवस उलटूनही अद्याप एक रुपयांची ही मदत या पूरग्रस्तांना झालेली नाही.
३१ ऑगस्टला रात्री तितूर-डोंगरी नदीला आलेल्या महापुरात नदीकाठावरील अनेक रहिवाशांचे संसार उपयोगी साहित्य वाहून गेले. काहींचे घरे कोसळली तर काहींची घराची पडझड झाली. अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी शेतामध्ये पिके पाण्याखाली आली. याबरोबरच शेकडो जनावरे पाण्यात वाहून गेली आहेत तर अनेक जनावरे जागेवरच मृत्युमुखी पडले आहेत. डोळ्यांदेखत पुरामुळे होत्याचे नव्हते झाले. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या विहिरींच्या नुकसानीचे पंचनामे होत नसल्याने शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे.
या अतिवृष्टीने आलेल्या महापुरामुळे चाळीसगाव तालुक्यात कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. गेल्या आठवड्यात या नुकसानीचे महसूल व कृषी विभागाकडून पंचनामे झालेत. दुसऱ्या टप्प्यातील अजूनही अनेक पंचनामे अजून बाकी आहेत. त्याला गती देणे आवश्यक आहे.
आज मिळतील, उद्या मिळतील अशी आस धरून बसलेल्या नुकसानग्रस्त कुटुंबासाठी शासनाकडून इतर ठिकाणांप्रमाणे तातडीची मदत अथवा सानुग्रह अनुदान वाटप व्हायला पाहिजे होती परंतु ती झाली नाही.
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या पाहणी दौऱ्यात काही मदत देतील अशी अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली. त्याचबरोबर अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या. मात्र, आश्वासनापलीकडेच काहीच मिळाले नाही.
नुकसान झालेल्यांमध्ये बहुतांश लोक हे सर्वसामान्य, हातमजुरीवर काम करणारे आहेत. पुरात वाहून गेलेल्या वस्तू आणि दुकानात नव्याने माल घेण्यासाठी या लोकांकडे पैसे नसल्याने अशा कुटुंबाचे हाल पाहण्यासाठी कोणीच वाली नसल्याची खंत नुकसानग्रस्त कुटुंब व्यक्त करीत आहे.
पूर ओसरला असला तरी या लोकांपुढे अनेक समस्या कायम आहेत. आजही अनेकांचा संसार उघड्यावरच थाटून आहेत अशी दयनीय परिस्थिती त्यांच्यावर ओढावली आहे.
आजपर्यंत या कुटुंबांना अनेक सामाजिक संस्थांनी हात पुढे करून समाजसेवेचे अनोखे दर्शन घडविले आहे. अनेकांनी जेवणाची, निवाऱ्याची आणि जीवनावश्यक वस्तूंची मदत केली आहे. मात्र, या कुटुंबांना शासनाची मदत मिळणार तरी कधी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
कोट
अतिवृष्टी व पुरामुळे चाळीसगाव तालुक्याचे सुमारे शंभर कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.या सर्वांना इतर ठिकाणी झालेल्या पूरग्रस्तांप्रमाणे किंवा त्यापेक्षा अधिक नुकसानभरपाई मिळावी. वेळेच्या आत शेतकरी, दुकानदार व सर्वसामान्यांना नुकसानभरपाई मिळाली नाही तर रस्त्यावर उतरावे लागेल.
- आमदार मंगेश चव्हाण.
कोट
चाळीसगाव तालुक्यात पहिल्या टप्प्यात झालेल्या नुकसानीतील घराची व पशुधनाची पंचनामे झाले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील नुकसानीचे पंचनामे सुरू असून दोन ते तीन दिवसांत पूर्ण होतील. त्याचा अहवाल आल्यावर शासनाकडे पाठविला जाईल.
-अमोल मोरे,तहसीलदार, चाळीसगाव
चाळीसगाव तालुक्यात ३१ रोजी झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाली असून मात्र अहवाल येणे बाकी आहे. दुसऱ्या टप्प्यातील नुकसानीचे पंचनामे प्रगतिपथावर आहे.त्यासाठी प्रयत्न सुरू आहे.
-सी.डी.साठे कृषी अधिकारी, चाळीसगाव