नाल्याच्या पुरात शेतकरी दाम्पत्य बैलगाडीसह वाहून गेले, महिला बचावली, पतीचा शोध सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 22:02 IST2021-07-15T21:43:46+5:302021-07-15T22:02:23+5:30
Flood: मुसळधार पावसामुळे नाल्याला आलेल्या पुरात शेतकरी पती- पत्नी बैलगाडीसह वाहून गेल्याची घटना निंभोरा ता. धरणगाव येथे गुरुवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास येथे घडली. दरम्यान, या पुरातून महिला बचावली आहे. पतीचा अजूनही थांगपत्ता लागलेला नाही.

नाल्याच्या पुरात शेतकरी दाम्पत्य बैलगाडीसह वाहून गेले, महिला बचावली, पतीचा शोध सुरू
जळगाव : मुसळधार पावसामुळे नाल्याला आलेल्या पुरात शेतकरी पती- पत्नी बैलगाडीसह वाहून गेल्याची घटना निंभोरा ता. धरणगाव येथे गुरुवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास येथे घडली. दरम्यान, या पुरातून महिला बचावली आहे. पतीचा अजूनही थांगपत्ता लागलेला नाही.
धरणगाव तालुक्यात गुरुवारी दुपारी मुसळधार पाऊस झाला. भागवत भीका पाटील (५५) आणि त्यांची पत्नी मालूबाई पाटील (५० रा. निंभोरा ता. धरणगाव) हे बैलगाडीने शेतातून घराकडे परतत होते. बैलगाडी खैऱ्या नाल्यातून जात असतानाच पाण्याचा प्रवाह अचानक वाढला आणि त्यातच बैलगाडीसह पती- पत्नी वाहून गेले.
वाहून जात असताना मालूबाई हिने एका झाडाला पकडून ठेवल्याने ती बचावली. पोलीस पाटील गुलाब सोनवणे व ग्रामस्थांनी पाणी पातळी खाली गेल्यावर जवळपास दोन किमी अंतरापर्यत पाहणी केली पण भागवत हे कुठेही आढळून आले नाही. नाल्यापासून काही अंतरावर दोन्ही बैल मृतावस्थेत
तर बाजूला गाडीही आढळून आली.