पहिला प्रेमविवाह झाला असताना दुसऱ्याशी केला विवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:21 IST2021-08-13T04:21:10+5:302021-08-13T04:21:10+5:30
पोलिसात दाखल गुन्ह्यातील फिर्यादीनुसार, पिंप्राळा भागात वास्तव्याला असलेला तरुण सरकारी नोकरीला आहे. लग्नासाठीच्या व्हाटसॲप गृपवर औरंगाबाद येथील तरुणीचे स्थळ ...

पहिला प्रेमविवाह झाला असताना दुसऱ्याशी केला विवाह
पोलिसात दाखल गुन्ह्यातील फिर्यादीनुसार, पिंप्राळा भागात वास्तव्याला असलेला तरुण सरकारी नोकरीला आहे. लग्नासाठीच्या व्हाटसॲप गृपवर औरंगाबाद येथील तरुणीचे स्थळ त्याला आले. दोघांच्या संमतीने ३ मे २०२१ रोजी औरंगाबाद शहरात थाटामाटात लग्न झाले. त्यानंतर मुलगी घरी आली असता काही दिवस तिला घरी सोडून तरुण नोकरीच्या ठिकाणी गेला. थोड्या दिवसानंतर पत्नीलाही तेथे घेऊन गेला. तेथे दोघंच वास्तव्याला असताना पत्नीची वागणूक व्यवस्थित नव्हती. घरी काही वाद, किंवा त्रास दिला का याबाबत आई, वडिलांना फोन करुन विचारणा केली असता त्यांनी तसा प्रकार नाही, परंतु ती इथेही व्यवस्थित वागत नव्हती, असे सांगण्यात आले.
प्रियकराने घेतली तरुणाची भेट
काही दिवसांनी पतीच्या मोबाईलवर अनोळखी नंबरवरुन एक मेसेज आला. त्यात तु ज्या मुलीशी लग्न केले आहे, तिच्याशी माझे प्रेमप्रकरण होते व आमचा प्रेमविवाह झाल्याचे त्याने सांगितले. त्यावर संपर्क केला असता त्याने लग्नाचे फोटो पाठविले. त्यानंतर हा प्रियकर या तरुणाला पुण्यात येऊन भेटला व दोघांचे फोटो दाखविले. त्यामुळे पतीने थेट जळगाव गाठून पत्नीच्या आई, वडिलांना बोलावून घेतले. त्यांना प्रेमविवाह तसेच दोघांचे इतर फोटाे दाखविले असता त्यांनी घरातच मुलीला मारहाण करुन जावायाची माफी मागितली व तिला सोबत औरंगाबाद येथे घेऊन गेले. दरम्यान, लग्न झाल्यानंतरही पत्नीने प्रियकरासोबत अनैतिक संबंध ठेवल्याचेही उघड झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. आई, वडिलांनी जबरदस्तीने लग्न लावून दिल्याचे तरुणीने पतीला सांगितले आहे. या प्रकारानंतर तरुणाने रामानंद नगर पोलीस ठाणे गाठून फसवणुकीची तक्रार दिली.