खामखेड ते मलकापूर दरम्यान गीतांजली एक्सप्रेसच्या डब्याला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 19:29 IST2019-06-12T19:28:31+5:302019-06-12T19:29:32+5:30
मुंबईहून-हावड्याकडे जाणाºया १२८५९ डाऊन गीतांजली एक्सप्रेसच्या एका डब्याला ब्रेकजाम झाल्याने डब्याखाली आग लागली. ही घटना खामखेड ते मलकापूर दरम्यान १२ जून रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली.

खामखेड ते मलकापूर दरम्यान गीतांजली एक्सप्रेसच्या डब्याला आग
भुसावळ, जि.जळगाव : मुंबईहून-हावड्याकडे जाणाºया १२८५९ डाऊन गीतांजली एक्सप्रेसच्या एका डब्याला ब्रेकजाम झाल्याने डब्याखाली आग लागली. ही घटना खामखेड ते मलकापूर दरम्यान १२ जून रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली.
गीतांजली एक्सप्रेस भुसावळ रेल्वेस्थानकावरून सुटली. पुढे ही गाडी मार्गाक्रमण करीत असताना खामखेड ते मलकापूर दरम्यान धावत्या गाडीचे चाक जाम झाले. यामुळे गाडीच्या एका डब्याखालून धूर निघू लागला. ही बाब प्रवाशांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी रेल्वे प्रशासनास कळविले. यानंतर काही वेळातच गाडीच्या याच डब्याखाली आग लागली.
पुढे ही गाडी मलकापूर रेल्वेस्थानकावर थांबविण्यात आली. तेव्हा दुपारचे १ वाजून ३७ मिनिटे झालेली होती. गाडी थांबताच रेल्वे कर्मचारी नवलसिंह पुंडलिक जाधव, गाडीचे गार्ड, चालक, सहाय्यक चालक, सफाई कामगार लखन, कपील, सौरभ, चंदू वाघमारे, प्रदीप आदींनी सतर्कता दाखवत अग्निरोधक यंत्राच्या सहाय्याने आग विझवली.
सुमारे दोन तास १६ मिनिटे उशिरा ही गाडी हावड्याकडे रवाना झाली. प्रवाशांसह रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने सुदैवाने या आगीत कुठलीही वित्त किंवा जीवितहानी झाली नाही.