अखेर पाचव्या दिवशी उघडले दहीवद शाळेचे कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 21:57 IST2018-07-13T21:57:06+5:302018-07-13T21:57:33+5:30
संस्थेच्या सचिवांची मध्यस्थी : गावकऱ्यांचेही एक पाऊल मागे

अखेर पाचव्या दिवशी उघडले दहीवद शाळेचे कुलूप
चाळीसगाव, जि.जळगाव : शालेय पोषण आहाराच्या ठेक्यावरुन स्थानिक संचालक आणि मुख्याध्यापक यांच्यात झालेल्या वादाचे पर्यावसन दहीवद शाळेला कुलूप लावण्यात झाले. अखेरीस पाचव्या दिवशी राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अरुण निकम यांनी मध्यस्थी करुन शुक्रवारी दुपारी एक वाजता शाळेचे कुलूप उघडले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ग्रामस्थांनीही एक पाऊल मागे घेतले.
दहीवद शाळेत शालेय पोषण आहाराच्या ठेक्यावरुन मुख्याध्यापक ईश्वर सीताराम अहिरे आणि स्थानिक संचालक यांच्यात वाद झाल्याने मुख्याध्यापक अहिरे यांची बदली केली होती.
कर्तव्यदक्ष मुख्याध्यापकाची बदली झाल्याने ग्रामस्थांचा संताप झाला. ७ रोजी ग्रामस्थांनी एकत्र येऊन थेट शाळेला कुलूप ठोकले. गेल्या पाच दिवसांपासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते.
शुक्रवारी अरुण निकम, उपाध्यक्ष डॉ. संजय देशमुख, बाळासाहेब चव्हाण, धनंजय चव्हाण, आनंदराव पवार अशोक पाटील, अशोक खलाणे, सरपंच सुरेखा पवार, माजी भीमराव पवार, उपसरपंच भीमराव खलाणे, धर्मा वाघ, हिंमत निकम, गोरख पवार, नवल पवार, मुख्याध्यापक ईश्वर अहिरे आदींच्या उपस्थित शाळेचे कुलूप उघडले गेले.