अखेर ‘त्या’ बालकाच्या मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:22 IST2021-08-20T04:22:13+5:302021-08-20T04:22:13+5:30
अकस्मात मृत्यू ते खुनाचा गुन्हा या घडामोडींमुळे अडावदसह परिसरातील वातावरण ढवळून निघाले आहे. याप्रकरणी तिघा संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल ...

अखेर ‘त्या’ बालकाच्या मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल
अकस्मात मृत्यू ते खुनाचा गुन्हा या घडामोडींमुळे अडावदसह परिसरातील वातावरण ढवळून निघाले आहे. याप्रकरणी तिघा संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला असून, पोलीस यंत्रणेच्या तपासातून काय निष्पन्न होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दि. १४ ऑगस्ट रोजी पांढरी शेतशिवारात नुना सायसिंग पावरा (१०, पांढरी, ता. चोपडा) या बालकाचा मृतदेह झाडाच्या फांदीला दोरीने गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच अडावद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण दांडगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. याबाबतीत मयत बालकाचे वडील सायसिंग सोन्या पावरा यांच्या खबरीवरून अडावद पोलिसात दि. १४ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
दि. १५ रोजी सुमारे २०० ते २५० महिला-पुरुषांचा जमाव अडावद पोलीस ठाण्यात येऊन याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करावा, यासाठी आक्रमक झाला होता.
दि. १३ रोजी नुना हा किशोर कोळी याच्या शेताजवळील रस्त्याने चारा घेण्यासाठी गेला होता. त्यावेळी किशोर कोळी हा हर्षल दिलीप कोळी व शरद रतन महाजन यांच्या सोबत त्याच्या शेतात आलेला होता. या तिघांनीच नुना पावरा यास गळफास देऊन झाडाला लटकवून जिवे ठार मारले, अशा आशयाची फिर्याद मयताचे वडील सायसिंग सन्या पावरा यांनी दिली आहे.
याबाबत अडावद पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.