अखेर बेंडाळे चौकातील १८ गाळे जि. प.कडून ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:12 IST2021-07-02T04:12:30+5:302021-07-02T04:12:30+5:30
जळगाव : जिल्हा परिषदेच्या मालकीचे बेंडाळे चौकातील १८ गाळे प्रशासनाने गुरुवारी पोलीस बंदोबस्तात सील केले. काही दुकानांवरील ...

अखेर बेंडाळे चौकातील १८ गाळे जि. प.कडून ताब्यात
जळगाव : जिल्हा परिषदेच्या मालकीचे बेंडाळे चौकातील १८ गाळे प्रशासनाने गुरुवारी पोलीस बंदोबस्तात सील केले. काही दुकानांवरील फलक हटविण्यात आले आहे. सकाळी दहा ते साडेबारापर्यंत शांततेत ही कारवाई झाली. गेल्या १७ वर्षांपासून या गाळ्यांचे भाडे थकल्याने डिसेंबर महिन्यात गाळेधारकांना गाळे खाली करण्यासंदर्भात नोटिसा देण्यात आल्या होत्या.
गेल्या काही दिवसांपासून हे गाळे सील करण्याबाबत प्रशासनाचे नियोजन सुरू होते. काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांना आठवडाभरापूर्वीच प्रशासनाकडून पत्र देऊन बंदोबस्त मागविण्यात आला होता. त्यानुसार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी के. बी. रणदिवे, बांधकाम विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता रवी पवार, गटविकास अधिकारी शशिकांत सोनवणे, बांधकाम विभागाचे अधिकारी सिसोदे यांच्यासह कर्मचारी व पोलिसांनी गुरुवारी सकाळी दहा वाजल्यापासून अल्पबचत भवनातील गाळे सील करण्याची कारवाई केली. यात काही दुकानांचे फलक तोडण्यात आले आहे, तर काही काढून टाकण्यात आले आहेत. प्रत्येक दुकानावर जि. प.चे पत्र लावण्यात आले आहे.
कोट्यवधींची थकबाकी
२००३ मध्ये या २० गाळ्यांचा करार संपला होता. तेव्हापासून पाच प. दंडासह कोट्यवधी रुपयांची थकबाकी गाळेधारकांकडे आहे. दरम्यान, १७ जुलै २०१९ रोजी गाळे ताब्यात घेण्याबाबत न्यायालयाकडून आदेश आल्यानंतर जि. प. प्रशासनाकडून कारवाईच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. यातील दोन गाळे ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर कोरोनाच्या काळात या कारवाईला ब्रेक बसला होता. दरम्यान, २५ डिसेंबर रोजी जि. प. बांधकाम विभागाने १८ गाळेधारकांना नोटिसा देऊन गाळे खाली करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पुन्हा काही दिवस या कारवाईला ब्रेक लागल्यानंतर सहा महिन्यांनी ही कारवाई करण्यात आली.
जि. प.चीच कार्यालये दबली
या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या बालविकास प्रकल्प अधिकारी तसेच तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची कार्यालये आहेत. मात्र, ही कार्यालये या गाळ्यांध्ये दबली गेली आहेत. आता यात मोठे फलक लावण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.