सफाईचा मक्ता रद्द करण्यासाठी मक्तेदाराला अंतिम नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 21:31 IST2019-12-31T21:31:16+5:302019-12-31T21:31:56+5:30
करारनाम्याचे उल्लंघन ; सात दिवसात मागविला खुलासा

सफाईचा मक्ता रद्द करण्यासाठी मक्तेदाराला अंतिम नोटीस
जळगाव- शहरातील दैनंदिन सफाईचा मक्ता असलेल्या वॉटरगेस कंपनीला मनपा प्रशासनाकडून अंतिम नोटीस बजाविण्यात आली आहे. मक्तेदाराने करारनाम्यातील अटी-शर्थींचा उल्लंघन केल्याचा ठपका मनपाने ठेवला असून, या संदर्भात सात दिवसात खुलासा पाठविण्याचा सूचनाही मनपाकडून देण्यात आल्या आहेत. शहरातील साफसफाईच्या प्रश्नावर नगरसेवकांसह नागरिकांकडून देखील मक्तेदाराच्या कामावर नाराजी व्यक्त केली जात होती.
मक्ता दिल्यानंतरही शहरात साफसफाई होत नसल्याच्या नागरिकांसह नगरसेवकांच्याही तक्रारी वाढल्या हेत्या. मनपाकडून अनेकदा सूचना देवूनही मक्तेदाराकडून कामात सुधारणा करण्यात आली नाही. तसेच कामाचे नियोजन केले नाही. अचानक काम बंद केल्यामुळे स्वच्छतेवर परिणाम झाला. कचरा विलगीकृत करण्यासाठी तीन महिन्यात ९५ टक्के काम करणे अपेक्षित असताना ते केलेले नाही. तसेच कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन अदा केलेले नाही.तक्रारी पुस्तकात दैनंदिन तक्रारीची नोंद घेतलेली नाही. तक्रारींची १२ तासाच्या आत निवारण केलेले नाही.त्यामुळे मक्ता रद्द का करण्यात येवू नये यासाठी मक्तेदाराला नोटीस बजावली असून सात दिवसात खुलासा मागविला आहे.