जय बजरंग मंडळ
मेहरूण परिसरातील जय बजरंग मित्रमंडळातर्फे यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही प्रकारची आरास करण्यात आलेली नाही. मात्र, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून नागरिकांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. यामध्ये संगीत खुर्ची, लिंबू चमचा, तरुणासांठी कबड्डी स्पर्धा आदी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाच्या ठिकाणी मंडपात गर्दी होऊ नये, म्हणून मर्यादित लोकानांच प्रवेश देण्यात येणार असून, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून, नागरिकांना बसविण्यात येत आहे, तसेच मास्क असणाऱ्यानांच मंडपात प्रवेश दिला जाणार आहे. सध्या मंडळाचे अध्यक्ष म्हणून संतोष पाटील तर उपाध्यक्ष म्हणून भावेश माळी हे काम पाहत आहेत.
लालबाग मित्रमंडळ
सागर पार्क येथील लालबाग मित्र मंडळाचे यंदाचे ११ वे वर्ष असून, मंडळाचे अध्यक्ष म्हणून भावेश कोल्हे, तर उपाध्यक्ष म्हणून दौलत रंधे हे काम पाहत आहेत. मंडळातर्फे यंदा शासनाच्या सूचनेनुसार साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे नियोजन केले आहे, तसेच मंडळातर्फे विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम व नाटकांचे कार्यक्रम आयोजित केेले जातात. मात्र, कोरोनामुळे नागरिकांची मंडपात गर्दी होऊ नये, यासाठी कुठलेही कार्यक्रम न घेता मूर्ती संकलनाचे काम हाती घेतले आहे. नागरिकांना मेहरूण तलावाच्या विसर्जनासाठी न येता, त्यांना मंडपात श्रीगणेश मूर्ती ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मंडपात आलेल्या मूर्ती संकलन करून, त्या मूर्ती लालबाग मित्रमंडळाचे कार्यकर्ते मेहरूण तलावावर विसर्जित करणार आहेत.
अर्थव मित्रमंडळ
विठ्ठल पेठेतील अर्थव मित्रमंडळातर्फे दरवर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येत असतो. विविध प्रकारची आरास सादर करण्यात येत असते. मात्र, यंदा कोरोनामुळे शासनाच्या सूचनेनुसार मंडळातर्फे साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्यात येत आहे. मंडळातर्फे यंदा आरास न करता, कोरोनाचे नियम पाळून मोजक्याच नागरिकांच्या उपस्थितीत संगीत खुर्चीसारखे सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे, तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मास्क व सॅनिटायझर वाटप करण्याचे नियोजन केले आहे. मंडळाचे अध्यक्ष म्हणून सध्या विवेक चौधरी तर उपाध्यक्ष म्हणून नीलेश खडके हे काम पाहत आहेत.