एफडीएचे पितळ पडले उघडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 19:07 IST2018-09-22T19:07:45+5:302018-09-22T19:07:59+5:30

एफडीएचे पितळ पडले उघडे
सुनील पाटील
जळगाव : गेल्या आठवड्यात पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी शहरातील दिग्गज मानल्या जाणाऱ्या गुटखा किंगचा पर्दाफाश केला. जी कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाने करायला हवी, ती कारवाई खुद्द पोलीस अधीक्षकांनी केली. २० लाखाच्यावर किमतीचा गुटखा पकडून पोलीस अधीक्षकांनी अन्न व औषध प्रशासनाला उघडे पाडले आहे. या कारवाईनंतर काही समर्थकांनी पोलिसांना कारवाईचा अधिकारच नाही असा प्रचार सुरु केला. मुळात ज्यांना अधिकार आहे, त्यांनी तर काय बोंब पाडली. पोलिसांना अधिकार नाही तर मग कोर्टात का जात नाही. मुळात महाराष्टÑात गुटखा बंदी असतानाही यांच्याकडे गुटखा सापडतो, मग तो नियमात आहे का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षापासून गुटख्याची सर्रास विक्री होत आहे. गुजरात व मध्य प्रदेशातून कंटेनर भरुन गुटखा जिल्ह्यात आणला जातो. शहरातील सहा ठिकाण व नशिराबाद सातवे ठिकाण पोलीस अधीक्षकांनीच शोधून काढले. पोलिसांना हे ठिकाण माहिती नाहीत असाही प्रकार नाही, परंतु खुद्द पोलीस अधीक्षक कारवाईसाठी रस्त्यावर उतरतात. अन्य ठिकाणांची माहिती त्यांच्या अधिकाºयांना देतात, यावरुन खालची यंत्रणाही उघडी पडलेली आहे. वाहत्या गंगेत पोलिसांनीही हात धुवून घेतलेले आहेत. अन्न व औषध प्रशासनाने आजपर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणात गुटख्याची कारवाई केल्याची ऐकिवात नाही. आजही काही ठिकाणी गुटखा खुलेआमपणे विक्री केला जात आहे. आता गुटखा विक्रीचा गुन्हा आयपीसीप्रमाणे नोंदविण्याचे निर्देशच न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आता पोलिसांनाही कारवाई करण्याचे अधिकार प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे आता भविष्यात गुटख्यावर कोण व कशी कारवाई करते हे येणारा काळच ठरवले