मुक्या बापाची लेक सर्व उपक्रमात नंबर एक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 00:39 IST2018-08-12T00:39:11+5:302018-08-12T00:39:40+5:30
धरणगाव येथे मुख्याध्यापकांच्या कवितेचे सातवीच्या विद्यार्थिनीने केले रसग्रहण

मुक्या बापाची लेक सर्व उपक्रमात नंबर एक
धरणगाव, जि.जळगाव : घरात कुठलेही शैक्षणिक वातावरण नसताना अवांतर वाचनाच्या सवयीने ‘एका मुक्या बापाची लेक सर्व शालेय उपक्रमात ‘नंबर एक’ पटकावित आपला ठसा उमटवत आहे. या सातवीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या वैशाली संजय रावतोळे या विद्यार्थिनीने मुख्याध्यापकांनी शतकमहोत्सवी वर्षात लिहिलेल्या कवितेचे समीक्षण केले. बालिकेने केलेले समीक्षण आणि रसग्रहण शिक्षकांना आवाक करणारे ठरले.
पी.आर. हायस्कूलच्या शतक महोत्सव सन २०१४ मध्ये तत्कालीन शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांच्या उपस्थितीत झाला होता. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.एन. चौधरी यांनी ‘पी.आर.गीत’ रचले होते. त्यात त्यांनी शाळेच्या १०० वर्षांची यशोगाथा मांडली होती. हे गीत इयत्ता सातवीच्या वर्गातील वैशाली रावतोळे या चिमुकलीने वाचले. तिला हे गीत भावल्याने तिने घरी या गीताचे समीक्षण लिहून मुख्याध्यापक चौधरी यांना दाखवले असता हे समीक्षण वाचून ते चकीत झाले. एवढ्यावरच न थांबता तिने आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसमोर या गीताचे रसग्रहण करण्याची संधी मागितली आणि आपल्या ओघवत्या वक्तृत्वाने तिने विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.
वैशाली हिच्या घरची परिस्थिती गरिबीची असून तिचे वडील मुके आहेत. एका मुक्या बापाची लेक प्रत्येक उपक्रमात सहभाग नोंदवून नंबर एक पटाकावते हे विशेष आहे.
तिच्या रसग्रहणाने भारावून मुख्याध्यापक बी.एन.चौधरी, उपमुख्याध्यापक एस.एम.अमृतकार, पर्यवेक्षक डॉ.संजीवकुमार सोनवणे, शिक्षक आर.के.सपकाळे, बी.डी. शिरसाठ, के.आर.वाघ, शरदकुमार बन्सी, डी.एस.पाटील यांनी वैशाली रावतोळेला शतकमहोत्सवी स्मृतीचिन्ह, गुलाबपुष्प, रंगपेटी देवून तिचा गौरव केला. शिक्षकांनी तिला ७५१ रुपयांचे रोख बक्षीस देवून तिच्या शैक्षणिक साहित्यासाठी मदत केली.