सडावणला कापूसभाव आंदोलनास्थळी गेलेल्या खासदारांना शेतकऱ्यांनी सुनावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 18:41 IST2017-11-04T18:34:02+5:302017-11-04T18:41:13+5:30
कापसाला ७ हजार भाव मिळावा यासाठी अमळनेर तालुक्यातील सडावण येथे रास्ता रोको

सडावणला कापूसभाव आंदोलनास्थळी गेलेल्या खासदारांना शेतकऱ्यांनी सुनावले
आॅनलाईन लोकमत
अमळनेर, ४ : स्वाभिमानी शेतकरी संघटना व संतप्त शेतकऱ्यांनी कापसाला ७ हजार रुपये भाव देण्यात यावा या मागणीसाठी सडावण येथे रास्ता रोको केला. शेतकऱ्यांची समस्या जाणून घेण्यासाठी आलेले खासदार ए.टी.पाटील यांना ‘तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय केले? असा सवाल केला. त्यानंतर आपल्या विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला दिले.
कापसाला प्रतिक्विंटल सात हजार रुपये हमीभाव द्यावा, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, तालुका लवकर दुष्काळी जाहीर करावा यासह इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिवाजी पाटील, अशोक पाटील, मधुकर पाटील, प्रवीण पाटील, जितेंद्र पाटील, सतिश पाटील, ज्ञानेश्वर मिस्तरी, गणेश पाटील, धनराज पाटील यांच्यासह सुमारे 300 शेतकऱ्यांनी सकाळी ९ वाजेच्या सुमारास रास्तारोको आंदोलन केले. यावेळी खासदार ए.टी.पाटील यांनी आंदोलकांशी चर्चा केली. शिवाजी पाटलाच्या आंदोलनाने मागण्या मान्य होतील का असा खोचक सवाल करताच काही शेतकरी खवळले ‘तुम्ही काय केले आज पावेतो, शेतकऱ्यांसाठी केंद्रात काय केले ?, तुम्ही मतदार संघात फिरकत नाहीत. असा प्रश्नांचा भडीमार सुरु केला. मात्र खासदारांनी वेळ मारून नेण्यासाठी लवकरच समस्या सुटतील आणि शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले. त्यानंतर ११ वाजेच्या सुमारास शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.