सायगाव परिसरातील शेतकरी संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:18 IST2021-09-23T04:18:11+5:302021-09-23T04:18:11+5:30
कपाशीला लागले ग्रहण सायगाव आणि संपूण परिसरात कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. मध्यंतरी कपाशी पीक डौलदार होते. रोगराई ...

सायगाव परिसरातील शेतकरी संकटात
कपाशीला लागले ग्रहण
सायगाव आणि संपूण परिसरात कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. मध्यंतरी कपाशी पीक डौलदार होते. रोगराई कपाशीपासून दूर होती; परंतु नंतर जो पाऊस झाला त्या पावसामध्ये रोग तर पसरलेच; पण येणारे पीकदेखील वाया गेले आहे. आता तर शेतकऱ्यांचा कपाशी लागवडीचा, निंदणीचा, फवारणीचा खर्चदेखील निघणार नसल्याचे चित्र आहे.
दुसरीकडे पावसाने जास्त प्रमाणात कहर केल्याने येणारे पीकदेखील लाल्या रोगामुळे वाया जाण्याची दाट शक्यता आहे. एवढेच नव्हे, तर दमदार व जोरदार पावसामुळे आधी निम्म्या गळालेल्या कपाशीच्या कैऱ्या आता पूर्णपणे गळून पडत आहेत. शेतकरी यामुळी संकटात सापडला आहे. आता शासनानेच ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी होत आहे.
शासनाकडून मदतीची आशा
सायगाव आणि संपूर्ण गिरणा व मन्याड परिसरात कधी नव्हे एवढा जोरदार पाऊस झाला. एवढेच नाही, तर मन्याड धरणाला ‘न भूतो न भविष्यती’ असा पूर आला व सर्व नांद्रे सायगाव शिवारातील शेतकऱ्यांचे पीक पूर्णत: वाहून गेले. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून, शेतकरी चिंतेत आहे. शासनाने पंचनामे तर केले, आता मदतीचा हात द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.