चाळीसगाव तालुक्यातील गणेशपूर येथील शेतकऱ्याची रेल्वेखाली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 14:56 IST2020-10-18T14:54:05+5:302020-10-18T14:56:20+5:30
गणेशपूर येथील रहिवासी असलेले अल्प भूधारक शेतकरी सुनील भिका पाटील यांनी रेल्वेखाली आत्महत्या केली.

चाळीसगाव तालुक्यातील गणेशपूर येथील शेतकऱ्याची रेल्वेखाली आत्महत्या
गणेशपूर, ता.चाळीसगाव : तालुक्यातील गणेशपूर येथील रहिवासी असलेले अल्प भूधारक शेतकरी सुनील भिका पाटील (वय ३८) यांनी अति पावसाने नापिकी झालेली शेती, वि.का. संस्थेकडून घेतलेले पीक कर्ज, नातेवाईक, मित्र परिवाराकडून घेतलेले हात उसनवारी पैसे व पत्नीच्या दीर्घ आजाराच्या उपचाराच्या कंटाळून रेल्वेखाली आत्महत्या केली.
पत्नीच्या दीर्घ आजारासाठी चाळीसगाव येथे खासगी रूग्णालयात उपचार चालू होते. दवाखान्यातील बील देण्यासाठी हातात पैसे नसल्याने ते चिंतेत होते. मी दवाखान्याचे बील भरण्यासाठी पैसे कुठूनही घेऊन येतो, असे पत्नीला सांगून ते दि.१६ रोजी दवाखान्यात गेले. ते परत आलेच नाही. त्यांनी औरंगाबाद-धुळे बायपास रेल्वे पुलाजवळ दि.१७ रोजी पहाटे तीनच्या दरम्यान रेल्वे खाली स्वत: झोकून आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली. त्यांच्या या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांच्या मागे पत्नी, दोन लहान मुले आहेत. शासनाकडून वारसाला शासकीय मदत मिळावी, अशी अपेक्षा गावकरी करीत आहेत.